भारत बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांचा सहभाग

पिंपरी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चार शेतक-यांचा बळी गेला आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हैद्राबादच्या निवडणूकांमध्ये व्यस्त आहेत. अन्नदात्या शेतक-यांवर अश्रूधूर, पाण्याचे फवारे मारणा-या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व पक्षीय आणि शहरातील सर्व कामगार संघटना सहभागी होतील अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली.

पिंपरी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चार शेतक-यांचा बळी गेला आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हैद्राबादच्या निवडणूकांमध्ये व्यस्त आहेत. अन्नदात्या शेतक-यांवर अश्रूधूर, पाण्याचे फवारे मारणा-या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्व पक्षीय आणि शहरातील सर्व कामगार संघटना सहभागी होतील अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला पाठींबा देण्यासाठी आकुर्डी येथे सर्व पक्षीय व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक मारुती भापकर, अंकुश कानडी, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शेकापचे नितीन बनसोडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, ओबीसी संघटनेचे आनंदा कुदळे, समता परिषदेचे चंद्रशेखर भुजबळ, कामगार नेते दिलीप पवार, शाम आगरवाल, अनिल रोहम, अशोक मिरगे, काशीनाथ शेलार, काशीनाथ नखाते, सचिन देसाई, गणेश दराडे, युवराज दाखले, राजन नायर, संदिपान झोंबाडे, विशाल जाधव, संजय गायके, क्रांतीकुमार कडूलकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कदम म्हणाले की, मंगळवारच्या भारत बंद दिवशी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि सर्व कामगार संघटनांनी आपले झेंडे घेऊन सहभागी व्हावे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत सर्व आंदोलनकर्ते अन्नत्याग करुन पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन करतील.

माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले की, आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ शहरातील व्यापारी, उद्योजक, फेरीवाले, पथारीवाले यांना आवाहन करतो की, आपण सर्वजण या भारत बंदमध्ये उर्त्स्फुत पणे सहभागी व्हावे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असणा-या कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचा हा केंद्र सरकारचा कुटील डाव आहे. या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल आणि शेती व्यवसाय भांडवलदारांच्या हातात जाईल.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी भारत बंदमध्ये सहभागी होणे म्हणजे शेतक-यांच्या उपकारातून उतराई होण्याची वेळ आली आहे. शहरातील राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यात सहभागी होतील. तसेच सर्व नागरीकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन वाघेरे पाटील यांनी केले.

गजानन चिंचवड यांनी सांगितले की, शहरातील सर्व शिवसैनिक या भारत बंदमध्ये सहभागी होतील. कामगार नगरीतील सर्व कामगारांनी देखील सहभागी व्हावे. मानव कांबळे म्हणाले की, बँका, एअरपोर्ट, संरक्षण खात्यातील केंद्रिय संस्थांचे खाजगीकरण करुन आता अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असणा-या शेतकरी आणि कामगारांचे अस्तित्वच या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांमुळे संपुष्टात येणार आहे. यामुळे शेतमालाचा किमान हमीभाव बंद होईल. भांडवलदारांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था एकवटली जाईल. हे भांडवलदार सर्व सामान्य नागरीकांचे शोषण करतील. भांडवलदारांना पाठबळ देणा-या केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत यासाठी हा निर्णायक लढा शेवटपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.