शेरेबाजी करण्यापेक्षा पाटलांनी कामे करावीत ; माजी आमदार मोहन जोशी यांचा खोचक सल्ला

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी विनाकारण शेरेबाजी केली. त्याचा समाचार घेताना मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. पण, गेली साडेचार वर्षे शहरातील मोठे प्रकल्प मात्र रखडले आहेत.

    पुणे : अन्य पक्षाच्या नेत्यांबद्दल उथळपणे शेरेबाजी करण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे.

    भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी विनाकारण शेरेबाजी केली. त्याचा समाचार घेताना मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. पण, गेली साडेचार वर्षे शहरातील मोठे प्रकल्प मात्र रखडले आहेत. भाजप ते मार्गी लावू शकलेले नाही. मुठा नदी सुधारणेसाठी ८०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा सहा वर्षांपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी केली होती. जावडेकर यांचे मंत्रिपद गेले पण, योजना अद्याप मार्गी लागली नाही. जावडेकर फक्त घोषणा करुन थांबले. स्मार्ट सिटी योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातच केली. पाच वर्षात योजनेचा पहिला टप्पाही भाजपला पूर्ण करता आला नाही. उलट, योजना गुंडाळण्याच्या तयारीतच मोदी सरकार आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या घोषणा झाल्या, त्या योजनेबाबतही वेळकाढूपणा चालला आहे. पुणे मेट्रोकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या योजनेचे काम लांबले. शहर विकासाकडे भाजपचे एवढे दुर्लक्ष झाले असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र शेरेबाजीत रमले आहेत, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.