नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडून चेष्टा; सात मिनिटात आटोपली पाहणी

६९ दिवसांपूर्वी अतिवृष्टीने केलेल्या तालुक्यातील ३७ हजार ३५० शेतक-यांच्या १३ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे व शेतजमिनीचे सुमारे १६ कोटी ८७ लाख रुपयांचे नुकसान केले.त्याच्या जखमा अजून ही ओल्या आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने ४२० सेकंदात पाहणी केली की पाहणीचा 'केंद्रिय फार्स' केला याचीच चर्चा तालुक्यात रंगली आहे.

 

इंदापूर: अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला दीड तासाचा वेळ निर्धारित केलेला असताना केवळ सात मिनिटातच पथकाने पाहणी आटोपल्याचा प्रकार आज घडला आहे. ६९ दिवसांपूर्वी अतिवृष्टीने केलेल्या तालुक्यातील ३७ हजार ३५० शेतक-यांच्या १३ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे व शेतजमिनीचे सुमारे १६ कोटी ८७ लाख रुपयांचे नुकसान केले.त्याच्या जखमा अजून ही ओल्या आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने ४२० सेकंदात पाहणी केली की पाहणीचा ‘केंद्रिय फार्स’ केला याचीच चर्चा तालुक्यात रंगली आहे.

ऑक्टोबर रोजी तालुक्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले.त्याची पाहणी करण्यासाठी नागपूर कृषी विभागाचे संचालक आर.पी.सिंग,नागपूर जलशक्तीचे अधीक्षक अभियंता एम.एस.सहारे व पुणे कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांचे पथक आज इंदापूरच्या दौ-यावर आले होते. इंदापूरच्या दौ-यात मदनवाडी व भादलवाडी या दोन ठिकाणी भेटी देवून नुकसानीची पाहणी व शेतक-यांची संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले होते. विश्रामगृहात उतरणे व त्यानंतर नियोजनाप्रमाणे काम करणे यासाठी दौ-यात दीड तासांचा अवधी देण्यात आला होता.

हे पथक १ वाजून ५१ मिनिटांनी तालुक्यातील भादलवाडी येथे आले.वाहनातून उतरून रस्त्यावरील पुलावरून दोन्ही बाजूंना पाहिले.शेतकऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी बोलले.त्यानंतर अवघ्या सातच मिनिटात म्हणजेच १ वाजून ५८ मिनिटानी दुस-या तालुक्याच्या भेटीसाठी रवाना देखील झाले.विशेष म्हणजे भादलवाडीतील भागात ज्या शेतकऱ्याची जमीन उसाबरोबर वाहून गेलेली आहे, याच ठिकाणी हे पथक थांबले होते. मात्र शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याची तसदी पथकाने घेतली नाही.