पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन लवकर द्या

आमदार सुनिल शेळके यांची मागणी
तळेगाव दाभाडे : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कोरोना काळात जनतेसाठी काम करणाऱ्या पोलीस पाटलांना मानधन मिळालेले नाही. त्यांचे रखडलेले मानधन त्यांना तातडीने मानधन देण्याची मागणी आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे. पोलीस आणि जनतेतील दुवा असलेल्या व कोरोना काळात पुढाकार घेवून सतत काम करणाऱ्या पोलीस पाटलांना मागील पाच महिन्यापासून शासनाकडून मानधन देण्यात आलेले नाही. यामुळे पोलीस पाटलांना कोरोना काळात आर्थिक अडचणीना सामना करावा लागत आहे. कोरोना काळात काम करत असताना अनेक पोलीस पाटलांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा कोरोना योद्ध्यांना शासनाने अद्याप मानधनापासून वंचित ठेवले आहे.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावात परगावाहून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन पोलिसांना देणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे इत्यादी अनेक कामे पोलीस पाटील करीत आहेत. मात्र, त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने पोलीस पाटलांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी तातडीने पोलीस पाटलांच्या मानधनाची प्रकिया पूर्ण केली असून लवकरच सर्व पोलीस पाटलांना मानधन मिळणार असल्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले.