वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर प्रशासनाचे लक्ष; आरटीपीसीआर चाचणीसाठी देणार ६४ लाख

    पिंपरी : आरटीपीसीआर कोरोना चाचणीसाठी शहरातील खासगी प्रयोगशाळांना प्रति आरटीपीसीआर चाचणीकरिता ५८० रूपये दर ठरविण्यात आला आहे. त्यानुसार, तीन प्रयोगशाळांना एका महिन्यात ११ हजार ९८ नमुने तपासणीपोटी ६४ लाख ३७ हजार रूपये देण्यात येणार आहेत.

    पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानंतर जास्तीत जास्त लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील चार खासगी प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर कोरोना चाचणी करून घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, १६ मार्च २०२१ पासून संबंधित प्रयोगशाळांना कामकाज आदेश देण्यात आले. त्यांना नेमून दिलेल्या रूग्णालयातून नमुना घेऊन जाऊन त्याची तपासणी करून अहवाल १२ ते २४ तासात महापालिकेस दिला जातो.

    प्रति आरटीपीसीआर चाचणीकरिता ५८० रूपये दर ठरविण्यात आला आहे. त्यानुसार, लाईफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड, मेटोपोलीस लॅब, पुणे, डॉ. लाल पॅथ लॅबस लिमिटेड, कृष्णा डायग्नोस्टीक्स या चार प्रयोगशाळांमार्पâत आरटीपीसीआर चाचणीचे कामकाज केले जात आहे. या चारही प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर चाचणी तपासणीची बिले मध्यवर्ती साहित्य भांडार विभागाकडे सादर केली आहेत.

    लाईफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड यांनी महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रूग्णालयातून ६ हजार २९ नमुने तपासणीपोटी ५८० रूपये प्रति चाचणीप्रमाणे ३४ लाख ९६ हजार रूपये बिल सादर केले आहे. मेटोपोलीस लॅब यांनी यमुनानगर आणि आकुर्डी रूग्णालयातून ४ हजार २८५ नमुने तपासणीपोटी २४ लाख ८५ हजार रूपये, तर, डॉ. लाल पॅथ लॅबस लिमिटेड यांनी सांगवी आणि थेरगाव रूग्णालयातून ७८५ नमुने तपासणीपोटी ४ लाख ५५ हजार रूपये बील सादर केले आहे. त्यानुसार, तीन प्रयोगशाळांना आरटीपीसीआर चाचणीअंतर्गत ११ हजार ९८ नमुने तपासणीपोटी ६४ लाख ३७ हजार रूपये देण्यात येणार आहेत.