शिनोली गावातील ग्रामरोजगार सेवकाकडून लोकांची फसवणूक

                                                                                                                                                                                                               भिमाशंकर:  शिनोली (ता. आंबेगाव ) गावातील आदिवासी ठाकर समाजातील बेरोजगार नारिकांनी पुणे जिल्हा परिषद यांचेकडे मनरेगा विशेष रोजगार अभियान अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागणी केली होती, पण मला कामाची आवश्यकता नाही असा मजकुर स्थानिक ग्रामरोजगार सेवक याने लिहून लोकांची फसवणूक केली, असल्याचे लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अखिल भारतीय किसान सभा पुणे सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी दिले आहे. 

पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन मनरेगा विशेष रोजगार अभियान मे २०२० रोजी सुरू केले. यासाठी सुमारे सात हजार श्रमिकांनी कामाची मागणी केली आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावातील आदिवासी ठाकर समाजातील सुमारे २५ ते ३० बेरोजगार नागरिकांनी जिल्हा परीषदेने सुरू केलेल्या विशेष अभियाना अंतर्गत कामाची मागणी मे २०२० रोजी नोंदवली. परंतु अदयाप पर्यंत त्यांना काम उपलब्ध झाले नाही. दि. ९ जुन रोजी स्थानिक ग्रामरोजगार सेवक याने या लोकांच्या सहया व अंगठे को-या कागदावर घेतल्या व मी हे काम सुरू करण्यासाठी तुमच्या सहया व अंगठे घेतोय असे सांगितले.    

परंतु दि. १० रोजी याच कागदाच्या वरच्या बाजुला पुणे जिल्हा परिषद यांचेकडे ऑनलाईन अर्ज एमआरजीएस मागणी केली होती, पण मला कामाची आवश्यकता नाही असा मजकुर लिहून लोकांची फसवणूक केलेली आहे. तरीही या प्रकारात सहभागी सर्व कर्मचारी व अधिकारी यांची तातडीने चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी व संबंधित कामे सुरू करण्यात यावी, असे लेखी निवेदन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अखिल भारतीय किसान सभा पुणे सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी दिले आहे.