ग्रामीण भागात लोकांनीच लॉकडाऊन पाळण्याची गरज

भिमाशंकर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह इतरत्र अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी सरकार परवानगी देत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांपासून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ग्रामीण

भिमाशंकर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह इतरत्र अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी सरकार परवानगी देत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांपासून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ग्रामीण भागातील लोकंानी आता खऱ्या अर्थाने लॉकडाऊन पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. हेच नागरिक आत्ता आंबेगाव तालुक्यासाठी चिंतेचे विषय झाले आहे. करोनाचा प्रसार थांबविण्यासाठी आंबेगाव तालुक्यात प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, तहसिलदार रमा जोषी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार आदि विविध विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, सुज्ञ नागरिक कोरोनाशी दोन हात करत असतानाही ग्रामीण भागातील जनता मात्र लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नाही.  

काही ठिकाणी शिस्तपालन होत असले तरीही अनेक ठिकाणी ग्रामस्थ विनाकारण फिरताना दिसत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत नाहीत. घराबाहेर न पडण्याचे आदेश असूनही करोना माझे काहीच बिघडवू शकत नाही, अशा आविर्भावात काही जण गरज नसताना घराची लक्ष्मणरेषा ओलांडून संचार करताना दिसत आहे. गावी आलेले बहुतेक लोक घरात शांत बसणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात करोनाचा प्रसार झपाटयाने वाढू शकतो. आत्तापर्यंत तालुक्यात गावाला आलेले १० कोरोना बाधित मुंबईकरच आढळून आलेले आहेत. त्यामुळे पुढील एक ते दोन महिने आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहेत. कुटुंबाला, गावाला करोना महामारीपासून वाचविण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत सर्वांनी जागृत व सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.