रेशन वाटपात काळाबाजार केल्याप्रकरणी आठ परवाने कायमस्वरूपी रद्द

दौंड : लॉकडाऊन काळात अन्न धान्य वाटपात मोठ्या प्रमाणात काळाबाजार केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सोमवार (रा.१६) रोजी दौंड तालुक्यातील आठ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली, देशात कोरोना संकट उभे राहिले असताना केंद्र व राज्य सरकार सर्वत्र लॉक डाऊन जाहीर केला होता, यावेळी सरकारने नागरिकांना रेशन कार्डवर अतिरिक्त तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ रेशन दुकानामार्फत वाटप करणार असल्याचे सांगितले होते, यावेळी अन्न धान्य वाटप करत असताना बायोमेट्रिक पद्धत न घेता वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, याचा फायदा घेत अनेक स्वस्त धान्य दुकानदार यांनी अन्न धान्य वाटपात मोठा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे जमा झाल्या होत्या, तसेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन वाटपात अनियमिता करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. या अनुषंगाने दौंड तालुक्यात एकूण आठ रेशन दुकानदारांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, या तक्रारींची चौकशी केली असता स्वस्त दुकानदारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते व तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला होता या अनुषंगाने दौंड शहरातील  एम. आर. लड्डा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राहक भांडार यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहे, तसेच दौंड ग्रामीण भागातील गोपाळवाडी येथील  बी. जी. दरेकर,  एस. आर. टेकावडे, मळद येथील अशोक एकनाथ सावळे, यवत येथील टी. के. तांबोळी, सोनवडी येथील जय अंबिका ग्राहक भांडार व प्रतिमेश महिला बचत गट या आठ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत असे पुरवठा अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी सांगितले.