प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागात  दुकाने खुली ठेवण्यास परवानगी

पुणे : कंटन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) वगळता शहरातील अन्य भागात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत विविध व्यवसायांची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली गेलेली आहे़ त्यामुळे पोलीसांनी विनाकारण दुपारीच

पुणे : कंटन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) वगळता शहरातील अन्य भागात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत विविध व्यवसायांची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली गेलेली आहे़ त्यामुळे पोलीसांनी विनाकारण दुपारीच दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करू नये़ अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत़ तसेच दुकाने बंद करण्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी जबरदस्ती केल्यास संबंधितांची तक्रार महापालिका आयुक्त कार्यालयात किंवा पोलीस आयुक्तालयात करावी असेही गायकवाड यांनी सांगितले आहे़

पुणे शहरातील ६९ कंटन्मेंट झोन वगळता अन्य भागात पुणे महापालिकेने विविध प्रकारच्या व्यवसायाची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी ६ मे पासून दिली आहे़ १२ मे रोजी नवीन आदेश जारी करून, या पूर्वी परवानगी दिलेल्या व्यवसायांबरोबर अन्य व्यवसायांनाही व्यवसाय सुरू करण्यास नव्याने परवानगी देण्यात आली आहे़ मात्र आजही शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील काही भागांमध्ये पोलीसांकडून दुपारीच दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती केली जात आहेत़ व्यावसायिकांनी पालिकेने दिलेल्या परवानगीनुसारच दुकाने सुरू ठेवले असल्याचे सांगितले तरी, काही ठिकाणी पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस स्टेशन अथवा वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगून दुकाने बंद करण्याबाबत व्यावसायिकांवर दबाव टाकत आहेत़

शहरातील विविध भागात हे प्रकार वारंवार घडत असल्याने, काही व्यावसायिकांनी पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली़ त्यामुळे याची दखल घेत महापालिका आयुक्त गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकाराबाबत माहिती दिली असता, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने दुपारीच बंद करणयाबाबतचे कुठलेही आदेश दिले गेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असल्याचे गायकवाड यांनी लोकमत शी बोलताना सांगितले़

शहरातील काही भागात जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत़ मात्र पोलीसांनी जबरदस्ती करून परवानगी दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंतच्या वेळेत दुकाने बंद करण्याबाबत जबरदस्ती करणे योग्य नाही़ जर असे प्रकार कुठे घडत असतील तर संबधित व्यावसायिक व दुकानदारांनी थेट माझ्याशी अथवा आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा़ तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातही याबाबत तक्रार करावी असेही गायकवाड यांनी सांगितले आहे़