चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ७६९६ मतदारांचे फोटो मतदारयादीतून गायब !

    पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे उघड झाले आहे. छायचित्र नसलेल्या या मतदारांचे छायचित्र घेण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या नागरिकांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.

    राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या एवूâण ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दूरध्वनी क्रमांकासहित यादी जिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये माहितीकरिता व संपर्काकरिता उपलब्ध केली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी त्यांची अलीकडच्या काळातील दोन रंगीत छायचित्रे वीजबील, गॅस पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक किंवा पासपोर्ट अशा रहिवासी पुराव्यासह चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात समक्ष जमा करावीत. अथवा, शनिवार आणि रविवारी होणाऱ्या विशेष शिबिरात मतदान केंद्रावरील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

    ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच १ जानेवारी २०२१ नंतर ज्या मतदारांनी नावनोंदणी केलेली आहे. अशाच मतदारांचे मतदान ओळखपत्र वाटप मतदान केंद्रावर केले जाईल. शिबिर हे केवळ ४९१ यादी भागांमध्ये असलेल्या मतदारांसाठी मर्यादित आहे. इतर यादी भागातील छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र शिबिर यानंतर आयोजित करण्यात येईल.

    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कोणत्याही मतदान केंद्रातील किंवा १ जानेवारी २०२० पूर्वी मतदार नावनोंदणी केलेल्या मतदारांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कोमल टिके (८८३०५११२१५) आणि अमर कांबळे (७०२०७८७८८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.