पिंपरी – चिंचवड आणि तेलअवीव या शहरांमध्ये खूप साम्य म्हणत; उद्योगनगरीत गुंतवणुकीसाठी इस्राईल उत्सुक

विकासात्मक आव्हानांवर मात करण्यासाठी इस्राईलमधील उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल. घनकचरा व्यवस्थापन, सौरउर्जा, इलेक्ट्रिक वाहने, जलनिःसारण, जलशुद्धीकरण अशा प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आणि नागरिकांना डिजीटल सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे - इस्राईलचे महावाणिज्य दूत याकोव्ह फिन्केलस्टेन

    पिंपरी: उद्योगनगरीतील विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पिंपरी – चिंचवड आणि तेलअवीव या शहरांमध्ये खूप साम्य असून त्या ‘सिस्टर सिटी’ आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या आदान – प्रदानासह शहराच्या विविध क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी इस्राईल उत्सुक आहे, असे मत इस्राईलचे महावाणिज्य दूत याकोव्ह फिन्केलस्टेन यांनी व्यक्त केले. पायाभूत सुविधा उत्तम असलेले पिंपरी – चिंचवड जागतिक दर्जाचे मॉडर्न शहर बनविण्यासाठी इस्रायली माहिती व तंत्रज्ञानाचे आदान प्रदान उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई येथील इस्राईल दूतावासाच्या शिष्टमंडळाने महापालिकेस नुकतीच भेट दिली. त्यात फिन्केलस्टेन यांच्यासह अर्थ व व्यापार खात्याचे प्रमुख सागी इचर, व्यापार अधिकारी पर्लिनी वाठोरे यांचा समावेश होता.

    शहराची भौगोलिक स्थिती, पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नियोजित प्रकल्प आणि सुविधा आदींची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली. उद्योगनगरीबरोबरच शहराची पर्यटन व मनोरंजन नगरी म्हणून नव्याने ओळख निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

    हिंदुस्थानासोबत इस्राईलचे संबंध वृद्धिंगत होत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले आदान – प्रदान महत्त्वपूर्ण आहे. इस्राईलमधील शहरे आणि पिंपरी – चिंचवडमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे देखरेख ठेवणे सुलभ होते. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर लाभदायी आहे. महापालिकेने केलेला शाश्वत विकास कौतुकास्पद असून, स्मार्ट सिटी अंतर्गत राबविलेले प्रकल्प आणि उपक्रम आश्वासक आहेत. विकासात्मक आव्हानांवर मात करण्यासाठी इस्राईलमधील उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल. घनकचरा व्यवस्थापन, सौरउर्जा, इलेक्ट्रिक वाहने, जलनिःसारण, जलशुद्धीकरण अशा प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे आणि नागरिकांना डिजीटल सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे इस्राईलचे महावाणिज्य दूत याकोव्ह फिन्केलस्टेन यांनी सांगितले. कोरोना काळात महापालिकेने केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

    महापौर उषा ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीस उपमहापौर हिराबाई घुले, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, जलनिःसारण – पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सीटीओचे राजा डॉन, पंकज लोंढे, निलेश जैन आदी उपस्थित होते.