पिंपरी चिंचवड़-  उपमहापौर पदासाठी भाजपाच्या हीराबाई घुले यांचे नाव निश्चित; राष्ट्रवादीच्या वतीने पंकज भालेकर यांनी भरला अर्ज

हिराबाई घुले या भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. मागील चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे. दरम्यान, मागील उपमहापौर घोळवे यांना केवळ चार महिन्यांचा कालावधी दिला होता. आता घुले यांना किती महिन्यांचा कालावधी दिला जातो, हे पाहणे महत्वाचे आहे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजपच्या वतीने हिराबाई उर्फ नानी घुले यांना उमेदवारी देण्यात आली असून शुक्रवारी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने पंकज भालेकर यांनी अर्ज भरला आहे. मात्र महापालिकेत भाजपचे बहुमत असल्याने घुले यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर येत्या मंगळवारी (दि.२३) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.

    केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी आज (शुक्रवारी) तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपकडून हिराबाई घुले यांचा नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज भरला आहे. महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. तत्पुपूर्वी राष्ट्रवादी तर्फे पंकज भालेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघिरे,विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे उपस्थित होते.

    प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेल मधून हिराबाई घुले या भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. मागील चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे. दरम्यान, मागील उपमहापौर घोळवे यांना केवळ चार महिन्यांचा कालावधी दिला होता. आता घुले यांना किती महिन्यांचा कालावधी दिला जातो, हे पाहणे महत्वाचे आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीला केवळ दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी (दि.२३) रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.