पिंपरी चिंचवड़मध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.०७ टक्के ; रुग्णसंख्या वाढ स्थिरावली

दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढल्याने मार्चच्या तुलनेत एप्रिल मध्ये सक्रिय रुग्णांची संख्या फार वाढलेली नाही. मार्च मध्ये शहरात ३४०८८९ रुग्णांची नोंद झाली होती. तर, दैनंदिन रुग्ण संख्या तीन ते साडेतीन हजारांच्या पुढे गेली होती.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून स्थिरावली असून रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा ७० दिवसांवर गेला आहे. नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी ८७.०७ टक्के आहे. तर, आतापर्यंतचा मृत्यूदर १. ३६ राहिला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून मृत्यूदर देखील वाढत आहे.

    एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या दुपटीच्या वेग हा ६४ दिवस होता. दुसऱ्या आठवड्यात हा वेग वाढून ६८ दिवसांवर आला. तिसऱ्या आणि आता शेवटच्या आठवड्यात हा वेग ७० दिवसांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत चालला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना थोडा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा २२.५६ होता. फेब्रुवारी ते मार्च या एका महिन्याच्या काळात शहरात चार पट रुग्ण संख्या वाढली होती. त्या तुलनेत आता रुग्ण संख्या स्थिरावली आहे.

    शहरात ३१ मार्चला १७ हजार ८१६ सक्रिय रुग्ण होते. तर २९ एप्रिलला २२ हजार ४५१ सक्रिय रुग्ण होते. मार्चच्या तुलनेत एप्रिल मध्ये रुग्ण वाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. तसेच दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढल्याने मार्चच्या तुलनेत एप्रिल मध्ये सक्रिय रुग्णांची संख्या फार वाढलेली नाही. मार्च मध्ये शहरात ३४०८८९ रुग्णांची नोंद झाली होती. तर, दैनंदिन रुग्ण संख्या तीन ते साडेतीन हजारांच्या पुढे गेली होती. पॉझिटिव्हीटी रेट हा ४० ते ५४ पर्यंत गेला होता. सद्यस्थितीत शहरात रोज होणाऱ्या तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. रोज सरासरी ११ हजार तपासण्या करण्यात येत आहेत. एवढ्या तपासण्या केल्यावर रोज दोन ते अडीच हजार या दरम्यान रुग्ण संख्या आढळून येत आहे.