भाजप राजवटीत पिंपरी- चिंचवडला वाली नाही – अजित पवार

भाजपचे सरकार असल्यामुळे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अमर मुलंचदानी चुकीचे वागत असले तरी, त्यांच्या चुकांवर पांघरुन घालण्याचे काम काहींनी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला

    पिंपरी: कुठल्याही शहराचा कायापालट करायचा असेल तर, कुणी तरी प्रमुखाने तिथे लक्ष देण्याची गरज असते. मागील साडेचार वर्षात भाजपचा कोणता नेता पिंपरी – चिंचवड शहरात आला ? त्याने काय केले ? असा सवाल करत भाजप राजवटीत या शहराला वाली राहिला नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. आपल्या जिल्ह्याकरिता जेवढा आपलेपणा असतो तेवढा बाहेरच्या व्यक्तीला नसतो. जरी, तो राज्याचा नेता असला तरी, ते नागपूर परिसरातील असल्याने त्यांचे नागपूरला लक्ष असल्याचा टोलाही अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगाविला.

    चिंचवड – संभाजीनगर येथील गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या स्वमालकीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते  झाले. बँक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर, बँक उपाध्यक्ष माजी नगरसेवक मधुकर बाबर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, भाजप नगरसेविका, बँक संचालिका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.

    अजित पवार म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिका २०१७ मध्ये भाजपच्या ताब्यामध्ये गेली. पण, कोणत्या नेत्याने पिंपरी – चिंचवड शहरात येऊन काय केले पाहिजे, कशापद्धतीने केले पाहिजे ? याचा कधी आढावा घेतला का ? शहरवासीयांनी याचा विचार केला पाहिजे. शहर विकास करण्यासाठी प्रमुख नेत्याने लक्ष देऊन वाटचाल केली पाहिजे. मुबंई महानगराबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. १७ वर्षे पिंपरी – चिंचवडच्या विकासाचा निर्णय आपण घेतला. भाजपचा कोणता नेता शहर विकासाचा निर्णय घेतो ? असा सवालही त्यांनी केला.

    राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी प्रकल्पाला मंजुरी दिली. चिखलीत उद्यानासाठी जागा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. आरटीओसाठीही दहा एकर जागा दिली आहे, त्याचेही काम लवकरच चालू होईल. पोलीस आयुक्तालयासाठीही मदत केली जात आहे. निगडीपर्यंत मेट्रो मंजूर केली आहे. पुणे – मुंबई हमरस्त्यालगत कामगार भवन उभे करायचे आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेची नवीन इमारत देखील बांधत आहोत. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न चालू असल्याचे अजित पवार म्हणाले.

    भाजपच्याच काळात अमर मूलचंदानी यांच्या चुकींच्या कामावर काहींनी पांघरुन घातले. पिंपरीतील दि सेवा विकास को – ऑपरेटिव्ह बँकेत गेल्या कित्येक वर्ष चुकीचे काम चालले होते. मागे पाच वर्षे भाजपचे सरकार असल्यामुळे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अमर मुलंचदानी चुकीचे वागत असले तरी, त्यांच्या चुकांवर पांघरुन घालण्याचे काम काहींनी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राजकीय जीवनात काम करत असताना माझ्या जवळच्या सहकाऱ्यांची बँक जरी चुकीची चालली तरी, मी अधिकाऱ्यांना ‘अ‍ॅक्शन’ घेण्यास सांगतो. हा कष्टाचा पैसा आहे, लोकांनी फार विश्वासाने बँकेमध्ये ठेवलेला असतो. ती विश्वासहर्ता कुठे कमी पडू द्यायची नसते, असेही पवार म्हणाले.