अवैध दारू विक्रीच्या विरोधात पिंपरी चिंचवड़ पोलिसांची जोरदार मोहिम

चाकण परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई म्हाळुंगे पोलिसांनी निघोजे येथील हॉटेल श्री गणेश याठिकाणी केली. याप्रकरणी संतोष बबन येळवंडे (वय ४० रा. निघोजे ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला तसेच देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला.

    पिंपरी: अवैध पद्धतीने दारू विक्रीच्या विरोधात पिंपरी चिंचवड़ पोलिसांनी जोरदार मोहिम सुरु केली असून या प्रकरणी शहरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. चाकण, निगडी व दिघी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

    चाकण परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई म्हाळुंगे पोलिसांनी निघोजे येथील हॉटेल श्री गणेश याठिकाणी केली. याप्रकरणी संतोष बबन येळवंडे (वय ४० रा. निघोजे ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला तसेच देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला. याच परिसरात साईबा हॉटेलवर दुसरी कारवाई करण्यात आली. आरोपी संजय शामलाल चौरसिया (रा. निघोजे ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी याठिकाणाहून अवैध दारू साठा जप्त केला.

    तिसरी कारवाई निगडी पोलिसांनी ओटास्किम, निगडी याठिकाणी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी बाजीराव राजाराम धोत्रे (वय ६२रा. ओटास्किम, निगडी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला सीआरपीसी ४१ (१) (अ) प्रमाणे समजपत्र देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनापरवाना अवैध पद्धतीने दारूची विक्री करत होता. निगडीतील आंबेडकर वसाहत याठिकाणी निगडी पोलिसांनी चौथी कारवाई केली. यामध्ये हातभट्टी दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला.

    आरोपी प्रदीप साहेबराव शिंदे (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सीआरपीसी४१ (१) (अ) प्रमाणे समजपत्र देण्यात आले आहे. दिघी पोलिसांनी मॅक्झीन चौक, दिघी याठिकाणी पाचवी कारवाई केली. याप्रकरणी शहाबाज जमीर काझी (वय २१ रा. आदर्शनगर, दिघी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ५२ हजार ४९६ रूपये किंमतीची देशी विदेशी दारू विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगली होती.