पिंपरी – चिंचवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चोरीच्या नऊ घटनांमध्ये साडेबारा लाखाचा ऐवज लंपास

घरफोडीच्या नऊ घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये १२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरात भोसरी एमआयडीसी, सांगवी, वाकड, चिखली, पिंपरी, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीच्या नऊ घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये १२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    डॉ. विवेक अनंतराव चिद्दरवार (वय ६१, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिलन (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विवेक हे डॉक्टर आहेत. त्यांचा रखवालदार असलेल्या आरोपी मिलनकडे फिर्यादी विवेकच्या इमारतीची सुरक्षेची जबाबदारी होती. मिलनने घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आतील ३ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, रोकड, हातातील तीन घड्याळे असा २ लाख २८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. नितीन रामचंद्र कदम (वय ४९, रा. साई मल्हार कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरातील १ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

    लखन श्रीरंग सूर्यवंशी (वय २१, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम मंडलिक (वय २२, रा. पिंपळे-गुरव) व एक अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सुर्यवंशी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना आरोपींनी घरातील ८० हजारांची रोकड, दोन मोबाईल असा ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दिलीप विश्वनाथ जाधव (वय ३५, रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांनी त्यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मोरवाडी चौकात लॉक करून पार्क केली होती. चोरट्याने ती चोरून नेली.

    वेस्ली वर्गीस (वय १९, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्गीस व त्यांचे मित्र रूमच्या दरवाजाची आतून कडी न लावता झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी फिर्यादी वर्गीस याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, अब्दुल्लाह उमर शेख बिस्मिल्लाह (वय १९) यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, अभिजेय बी. (वय २०) यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल, शालिम स्वरूपकुमार शिंदे यांचा ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल असे ६१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. संचिता केशव मोरे (वय ३५, रा. सुदर्शननगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोरे यांची नजर चुकवून चोरटा त्यांच्या घरात घुसला. घरातून ८९ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले.

    पूनम राजाभाऊ भिसे (वय २५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मी व्यकंट मल्यालम (वय २३), निकीता देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी भिसे यांचा ३५ हजार रूपयांचा लॅपटॉप चोरून नेला. शिवशांत सुभाषराव जाधव (वय ३४, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिवशांत यांच्या मामाचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील १२ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोकड असा ५ लाख ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. विनीत कुमार मल्ल (वय २५, साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मल्ल यांची खोली कुलूपबंद असताना चोरट्याने बनावट चावीने कुलूप उघडून त्यांचा ३५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.