आदिवासी भागात भीमाशंकर औषधी वनस्पती लागवड, प्रक्रिया क्लस्टर उभारावा

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली मागणी

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली मागणी                                                                                                                                                     

भिमाशंकर : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज योजनेअंतर्गत कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत मुकाबला करण्यासाठी शंभर कोटींच्या निधीची तरतूद करून आदिवासी भागामध्ये भीमाशंकर औषधी वनस्पती लागवड व प्रक्रिया क्लस्टर उभारण्याची मागणी केंद्र व राज्य सरकारसह आयुष मंत्रालयाकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक व वनमंत्री संजय राठोड आदिंना यासंदर्भात आढळराव पाटील यांनी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. टाळेबंदीमध्ये सर्वच क्षेत्रांची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. या ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने जाहिर केलेले आत्मनिर्भर भारत अंतर्गतचे पॅकेज अभिनंदनीय आहे. या पॅकेज अंतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्डा अंतर्गत देशात मोठया प्रमाणावर औषधी वनस्पती लागवड व प्रक्रिया क्लस्टर उभारण्याचे जाहिर करण्यात आले आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव, जुन्नर व खेड तालुके दुर्ग आणि आदिवासी बहुल आहेत. या परिसरात भीमाशंकर अभयारण्य असून वनोपजावरावर आदिवासी समाजाचा चरितार्थ आहे. मात्र सध्या वनक्षेत्र घटत असल्याने आदिवासी समाजाला रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. आदिवासी समाजाच्या औषधी वनस्पतींच्या औषधोपचाराचे ज्ञानाचे आणि कौशल्याचे संवर्धन, जतन होणे गरजेचे आहे. यानुसार देशात १० लाख हेक्टरवर औषधी वनस्पती लागवड करण्याचे नियोजित आहे. यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यालगत ८०० हेक्टरवर लागवड नियोजित आहे.  

-५०० एकर वनक्षेत्रावर उभारण्यात यावे
केंद्र व राज्यशासनाकडे भीमाशंकर औषधी वनस्पती आणि प्रक्रिया क्लस्टर हे ५०० एकर वनक्षेत्रावर उभारण्यात यावे, या वनक्षेत्रावर उत्पादित होणाऱ्या वन औषधींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र देखील उभारण्यात यावे. तसेच औषधी वनस्पती लागवड व प्रक्रियेचे क्लस्टर भविष्यात आदिवासी समाजाचे रोजगाराचे उत्तम मॉडेल ठरून आदिवासी बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यात महत्वाचा टप्पा ठरेल,अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.