पीएमपीएमएलचा ए.सी.प्रवास महागणार, एक्सप्रेस बस प्रवासासाठी तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय

एसी बससह स्पेशल आणि एक्सप्रेस बससेवेसाठी किलोमीटर निहाय टप्पे आणि तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, प्रवाशांना पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० ते १५ रूपये तर ६० किलोमीटर प्रवासासाठी ६५ ते ७० रूपये तिकीट दर मोजावा लागणार आहे.

  पिंपरी: कोरोना संकटात मर्यादीत प्रवाशी संख्येमुळे घटलेले उत्पन्न, डिझेल, सीएनजी, स्पेअरपार्टमध्ये झालेली दरवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) वातानुकुलीत (ए. सी.) व मर्यादीत बस प्रवासासाठी पाच रूपये आणि एक्सप्रेस बस प्रवासासाठी दहा रूपये तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  एसी बससह स्पेशल आणि एक्सप्रेस बससेवेसाठी किलोमीटर निहाय टप्पे आणि तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, प्रवाशांना पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० ते १५ रूपये तर ६० किलोमीटर प्रवासासाठी ६५ ते ७० रूपये तिकीट दर मोजावा लागणार आहे.

  पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये नव्याने भाडेतत्वावरील वातानुकुलीत १५० ई-बस आणि ४६२ सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलकडे एकूण २ हजार ५५८ बस संचलनासाठी उपलब्ध झाल्या आहेत. पीएमपीएमएलची बससंख्या विचारात घेता सध्या असलेल्या मार्गांचे रॅशनलायजेशन करण्यात येणार आहे.

  सुधारीत मार्ग रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे बसची वारंवारीता वाढणार असून याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. सध्या डिझेल, सीएनजी, स्पेअरपार्टमध्ये दरवाढ झाली आहे. त्यातच कोरोना संकटकाळात प्रत्येक बसमध्ये केवळ २२ प्रवासी अशी मर्यादा आली आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले आहे.

  हा वाढता खर्च विचारात घेऊन पीएमपीएएमलने ए.सी. बस प्रवासासाठी पाच रूपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी बससह स्पेशल आणि एक्सप्रेस बससेवेसाठी किलोमीटर निहाय टप्पे आणि तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत.

  पुणे आणि पिंपरी – चिंचवड मध्यवर्ती, दाट वस्तीच्या रस्त्यांवरील मिडी बस, जनता बससाठी तिकीट दर प्रचलीत दरानुसार पाच रूपये एवढाच ठेवण्यात आला आहे. ई-बसेस (वातानुकुलीत) प्रवासाकरिता प्रत्येक टप्प्याला पाच रूपये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मर्यादीत बससेवेसाठी प्रत्येक टप्प्याला पाच रूपये तर एक्सप्रेस सेवेसाठी प्रत्येक टप्प्याला १० रूपये वाढ करण्यात येणार आहे.

  विमानतळ सेवेकरिता ए.सी. बस प्रवासासाठी तिकीट दर ५० रूपये, १०० रूपये आणि १५० रूपये अशा टप्प्यांमध्ये राहणार आहे. रातराणी सेवेकरिता प्रत्येक टप्प्यासाठी पाच रूपयाऐवजी दहा रूपये तिकीट दरवाढ राहील. तर, ई-पेमेंटसाठी पाच टक्के सवलत राहणार आहे.

  मिडी बस, जनता बस – प्रचलीत दर
  ई-बस (ए.सी.) – पाच रूपये वाढ
  मर्यादीत बससेवा – पाच रूपये वाढ
  एक्सप्रेस सेवा – दहा रूपये वाढ