Gangster procession on release from prison; Police sent him back to jail

कुख्यात गॅंगस्टर गजानन मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे या मार्गावरून रॅली काढून दहशतीचे वातावरण निर्माण करत त्याचे ड्रोन शूटिंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या शिरगाव चौकीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पोलिसांनी एक ड्रोन, ११ कार, १२ मोबाईल जप्त करत १७ जणांना अटक केली आहे.

    पिंपरी : कुख्यात गॅंगस्टर गजानन मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे या मार्गावरून रॅली काढून दहशतीचे वातावरण निर्माण करत त्याचे ड्रोन शूटिंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या शिरगाव चौकीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पोलिसांनी एक ड्रोन, ११ कार, १२ मोबाईल जप्त करत १७ जणांना अटक केली आहे.

    सागर सुखदेव थिटमे (वय २५, रा. धायरी, पुणे), संतोष चंद्रकांत शेलार (वय ३६, रा. कोंढवे धावडे, पुणे), रघुनाथ चंद्रकांत किरवे (वय ४९, रा. भोर, पुणे), सागर वसंत शेडे (वय २९, रा. कोंडवे धावडे, पुणे), मावली रामदास सोनार (वय २०, रा. कोंढवे धावडे, पुणे), आशिष वसंत अवगडे (वय २३, रा. उत्तम नगर, पुणे) यांना १९ फेब्रुवारी रोजी तर त्यांचे अन्य साथीदार अनिल राजाराम मदने (वय ४२, रा. औंध, पुणे), मयूर अर्जुन गाडे (वय २१), व्यंकटेश व्यंकय्या स्वर्पराज (वय ३६, रा. धानोरी, पुणे), शुभम मनोहर धुमणे (वय २३, रा. धानोरी, पुणे), शैलेश रवींद्र गावडे (वय ३०, रा. चिंचवड पुणे), अखिल जयवंत उभाळे (वय २७, रा. विश्रांतवाडी, पुणे), अभिजित विजय घारे (वय ३५, रा. बेबडओव्हळ, पुणे), अनिल संपत जाधव (वय ३७, रा. पुरंदर, पुणे), निलेश रामचंद्र जगताप (वय ३९, रा. पुरंदर, पुणे), रोहन अर्जुन साठे (वय ३४, रा. येरवडा, पुणे), योगेश राम कावली (वय २८, रा. चिंचवड) यांना २० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे.

    कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याची दोन खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली. सबळ पुराव्या अभावी ही सुटका झाली असून त्याला १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर मारणेच्या समर्थकांनी तळोजा कारागृहापासून ते पुण्यापर्यंत त्याची रॅली काढली. दरम्यान पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर फटाके फोडून त्याचे स्वागत करण्यात आले. दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. या संपूर्ण प्रकारचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग देखील करण्यात आले. याबाबत शिरगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

    या गुन्ह्यात गजानन पांडुरंग मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन अप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार, अनंता ज्ञानोबा कदम, प्रदीप दत्तात्रय कंदारे, बापू श्रीमंत बाबर, गणेश नामदेव हुंडारे, सुनील नामदेव बनसोड आणि अन्य आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. हे आरोपी फरार असून त्यांच्या मागावर पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

    पोलिसांनी गुन्ह्यातील एक ड्रोन कॅमेरा, ११ आलिशान कार, १२ मोबाईल फोन जप्त केले आहेत. आणखी १५० ते २०० वाहने आणि आरोपींना अटक करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांनी नऊ तपास पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखा आणि विश्लेषणची विशेष टीम देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तयार केली आहे. त्याद्वारे अन्य आरोपींचा आणि मुद्देमालाचा शोध सुरु आहे. हा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा – एक) प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, उपनिरीक्षक गावीत आणि शिरगाव परंदवडी पोलीस करीत आहेत.