‘पत्नीला सोडून दे, नाहीतर तू मंत्री काय साधा आमदारही होणार नाही ‘ असे सांगणाऱ्या राजकीय गुरुला पोलिसांकडून अटक

तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि मुलाला तिच्या ताब्यातून काढून घे. मी लिंबू देतो, ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल’, असे सांगता स्वत:'ला तथाकथित राजकीय गुरूने महिलेचा छळ करण्यास पतीला भाग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आजही उच्चशिक्षित लोकांवर अंधश्रद्धेचा किती मोठा पगडा आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती या घटनेतून समोर आली आहे. ‘तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही. तिला सोडून दे. जर तुझी ही पत्नी म्हणून अशी कायम राहिली, तर तू मंत्री काय साधा आमदार होणार नाहीस; त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि मुलाला तिच्या ताब्यातून काढून घे. मी लिंबू देतो, ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल’, असे सांगता स्वत:’ला तथाकथित राजकीय गुरूने महिलेचा छळ करण्यास पतीला भाग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    रघुनाथ येमुल (३६) असे स्वतःला राजकीय गुरू म्हणवून घेणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चतुःशृंगी पोलिसांनी येमुलसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पीडित महिला उच्चशिक्षित कुटुंबातील असून, २३ जानेवारी २०१७ पासून त्यांचे पती गणेश गायकवाड छळ करत आहेत. सिगारेटचे चटके देणे, बहिरापणा येईपर्यंत मारहाण करणे अशा स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचार गायकवाड यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणी पीडित महिलेनं मागील महिन्यात पतीसह आठ जणांविरोधात तक्रार दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात सहा जणांना अटक पूर्व जामीन मिळाला असून, पती गणेश गायकवाड आणि अन्य एक जण अद्याप फरार आहे.