पोलिस अधिका-याच्या एका फोनवर ६० जमीन सावकाराने केली परत ; इंदापूर तालुक्यातील तावशी येथील प्रकार

बारामती : खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जाच्या बदल्यात लाटलेली ६० लाख रुपये किंमतीची शेतजमीन बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या फोन नंतर घाबरलेल्या सावकाराने मूळ मालकास परत करण्याचा निर्णय घेतला.इंदापूर तालुक्यातील तावशी येथे घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलाची मान आणखी उंचावली आहे.

तावशी(ता.इंदापूर) येथील खाजगी सावकाराने एका कर्जदारास ५ लाख रुपये व्याजाने दिले होते. या कर्जापोटी अव्वाच्या सव्वा व्याजाने पैशांची वसुली या सावकाराने केली,पाच लाख रुपयांचे १९ लाख रुपये सावकाराने घेतले, तरीदेखील मुद्दल बाकी असल्याचे सांगून कर्जदाराची जमीन बळकावली होती.कर्जदारावर दबाव आणून जमीनीचे रितसर खरेदीखतही झाले. मात्र कर्जदाराने बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. वास्तविक पाहता हा प्रकार इंदापूर तालुक्यातील असल्याने बारामती शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नव्हता, मात्र पोलिस निरीक्षक शिंदे यांनी या सावकाराला फोन करून “तुम्ही बारामती शहर पोलिस ठाण्यात या, चौकशी करायची आहे “एवढेच फोनवर सांगितले. सावकारकीचा बिमोड करणा-या पोलिस अधिका-याचा फोन आल्याने सावकार घाबरुन त्याने बळकावलेली ६० लाख रुपयांची जमीन कर्जदारास विना अट स्वखर्चाने नावावर करुन दिली. दरम्यान ख-या अर्थाने पिडितांसाठी सिंघम असलेल्या या पोलिस अधिका-याचे कौतुक सर्वत्र होत आहे.