अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर  : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड परिसरातील मांढरे वस्ती या ठिकाणी एका इमारतीमध्ये शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत अवैध्यरित्या साठविलेला गुटखा साठा व तीन वाहने जप्त केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीच्या आतमध्ये तीन खोल्यांमध्ये काही नागरिकांनी अवैध्यरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक तेजस रासकर, रविकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे यांसह आदींनी त्या ठिकाणी जात छापा टाकला त्या ठिकाणी तीन वाहने तसेच सदर इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा मिळून आला. तर त्या ठिकाणी अंदाजे तीस लाख रुपयांचा गुटखा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र ज्या ठिकाणी गुटखा साठा मिळून आला त्या इमारतीला चारही बाजूने सीसीटीव्ही असल्याने शिक्रापूर पोलिसांनी देखील आर्श्चय व्यक्त केले आहे. मात्र या ठिकाणी किती दिवसांपासून गुटखा साठविला जात आहे. सदर गुटखा कोठून येत आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही, तर यावेळी बोलताना सदर ठिकाणी गुप्त बातमीदारा मार्फत गुटखा असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही येऊन छापा टाकला असता येथे मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला असुण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिलेली आहे. तसेच मिळून आलेल्या गुटख्याचे मोजमाप सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी सांगितले आहे.
– गुटखा आहे कि सोन?
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ज्या ठिकाणी गुटखा आढळून आला त्या इमारतीला असलेली सीसीटीव्ही सुविधा व संरक्षण पाहून या इमारतीमध्ये गुटखा आहे कि सोन असा प्रश्न नागरिकांना पडला असून इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा येत असताना देखील प्रशासनाला काहीच माहिती कशी नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
– गुटखा विक्रीवर कारवाई करणार का?
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे गुटखा साठ्यावर कारवाई करून शाबासकी मिळविणारे पोलीस परिसरात होणाऱ्या इतर गुटखा विक्रीवर कारवाई करणार कि एक कारवाई करून वरिष्ठांकडून पाठ थोपटून गप्प बसणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.