पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन गौरविणार

लॉकडाऊन काळात रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍यांचा सन्मान पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम करणार्‍या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आपत्ती सेवा पदक

लॉकडाऊन काळात रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍यांचा सन्मान

पुणे :
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम करणार्‍या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आपत्ती सेवा पदक देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.राज्यात मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला आहे. त्यात संचारबंदीची अंमलबजावणी करताना व लोकांनी घरात रहावे म्हणून पोलीस अहोरात्र रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करीत आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सामाजिक बांधिलकी कायम ठेवण्याचे अभुतपूर्व काम या काळात पोलीस करीत आहेत. हे करीत असताना राज्यात आतापर्यंत १३८८ हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सुमारे २० पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना मृत्युला सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने लाखो मजूर, कामगार आपल्या गावी जाऊ शकले नाही. व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली़, अशा लाखो लोकांना पोलिसांनी या काळात मोठ्या प्रमाणावर मदत करुन त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय केली. आजपर्यंतच्या पोलिसांच्या इतिहासात इतके मोठे सामाजिक कार्य पोलिसांकडून प्रथमच होत आहे.केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांची यादीबनवून त्यांची प्रत्यक्ष विशेष श्रमिक रेल्वेगाड्या तसेच एसटी बसद्वारे त्यांच्या गावी रवाना करण्याची मोठा शिस्तबद्ध कार्यक्रम राज्यातील पोलिसांनी राबविला आहे. अजूनही त्याची कार्यवाही सुरु आहे.राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. अशा सर्वांचे कौतुक, प्रोत्साहन करण्याकरीता त्यांना गृहविभागातर्फे आपत्ती सेवा पदक अथवा तत्सम पदक देऊन त्यांचा गौरवकरण्याकरीता सविस्तर प्रस्ताव सादर करावा असा आदेश गृहमंत्री अनिल देशमुखयांनी दिला आहे.