पोलीस ऐकणार पुणेकरांच्या समस्या

ऑनलाइन सर्व्हेद्वारे जाणून घेणार अडचणी ; मार्गही शोधणार पुणे : लॉकडाऊन काळातही शहरातील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडत आहेत? त्यांच्या समस्या समजून घेत त्या नेमक्‍या कशा सोडवता येतील

ऑनलाइन सर्व्हेद्वारे जाणून घेणार अडचणी ; मार्गही शोधणार

पुणे : लॉकडाऊन काळातही शहरातील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडत आहेत? त्यांच्या समस्या समजून घेत त्या नेमक्‍या कशा सोडवता येतील याचा आराखडा तयार करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाइन सर्व्हे केला जात आहे. जेणेकरून नागरिक जास्तीत जास्त घरी राहून करोनाशी लढता येईल, असा विचार केला जात आहे.

 लॉकडाऊन काळात विविध वस्तू आणण्यासाठी किंवा इतर कामांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. तसेच, नागरिकांची गरज लक्षात घेऊन अनेक ठिकाणी बेकायदा मंडई भरत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. करोनाला रोखण्यासाठी घरातच थांबा असे, आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांच्या नेमक्‍या कोणत्या गरजा आहेत ज्यासाठी ते बाहेर पडत आहे. ही गरज व त्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील यासाठी हा सर्व्हे घेण्यात येत आहे.

नाव, वय व कुटुंबात व्यक्‍ती किती आहेत? घरात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत का? काय आणण्यासाठी व कितीवेळा आपण घरातून बाहेर पडता? लॉकडाऊन काळात आपल्याला कोणत्या अडचणी येत असून करोनामुळे आपली मनस्थिती कशी आहे? तसेच आपण शहराच्या कुठल्या भागात राहता? असे प्रश्‍न सर्व्हेत विचारले जात आहेत. मंगळवारपासून (दि.१९) हा सर्व्हे सुरू झाला असून नागरिकांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.

नियमित मास्क व सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे ही आता आपली जीवनशैली होणार आहे. या तीनही गोष्टी आपल्या दैनंदिन स्वभावात येणे गरजेचे आहे. त्यासाठी काय केले पाहिजे, हे समजून घेण्यासाठी हा सर्व्हे मदत करणार आहे. या सर्वांसाठी एक टीम नियुक्‍त केली आहे.

– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्‍त