मेट्रोच्या ट्रायल रन नंतर पॉलिटिकल ‘गन’ ; पुणे शहरात राजकीय धुलवड सुरु

मेट्रोची 'ट्रायल रन' झाल्याने काॅंग्रेसची स्वप्नपुर्ती झाल्याची प्रतिक्रीया माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग असे पर्याय तज्ज्ञांनी सुचविले होते आणि काँग्रेस पक्षाने आणि त्याच्या नेत्यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

    पुणे :पुणे मेट्राेची ट्रायल रन पार पडल्यानंतर आता राजकीय धुलवड सुरु झाली आहे. मेट्राेचे खरे शिल्पकार माजी खासदार सुरेश कलमाडी, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हेच असल्याचा दावा आता काॅंग्रेसआणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून केला जात आहे. ट्रायल रनला कलमाडी यांना निमंत्रित न केल्याचा निषेध काॅंग्रेसने केला आहे.

    पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाच पुणे मेट्राेचा प्रस्ताव मान्य झाला हाेता असा संदर्भ देत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘ पुणे मेट्राेला तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्रातील संयुक्त पुराेगामी आघाडी सरकारच्या प्रयत्नाने मान्यता मिळाली हाेती. भाजपच्या सत्तेत मेट्राे प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाला. त्यामुळेच विलंब झाला आहे. नागपूर मेट्राेचे काम वेगात हाेत असतानाच पुण्यातील मेट्राेचे काम रेंगाळले हाेते.’’

    मेट्रोची ‘ट्रायल रन’ झाल्याने काॅंग्रेसची स्वप्नपुर्ती झाल्याची प्रतिक्रीया माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग असे पर्याय तज्ज्ञांनी सुचविले होते आणि काँग्रेस पक्षाने आणि त्याच्या नेत्यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. पुण्यात मेट्रो व्हावी असा ठराव काँग्रेस पक्षाने महापालिकेत मंजूर केला होता. त्यानंतर दिल्ली मेट्रोकडे प्रारुप आराखडा बनविण्याचे काम देण्यात आले होते. हा आराखडा काही किरकोळ बदलांसह काँग्रेसच्याच शासनकर्त्यांनी मंजूर केला. मेट्रोसाठी जागा संपादन, राज्य, केंद्र सरकारची मंजुरी, वित्तीय संस्थांची मदत अशा सर्व किचकट प्रक्रिया काँग्रेसच्याच शासनाने मंजूर करुन घेतल्या होत्या. मेट्रो रेल्वेसाठी कायदा तयार करुन मेट्रोच्या विस्ताराची मुभाही काँग्रेस शासनानेच दिली हाेती असे जाेशी म्हणाले. भाजपच्या शासनाने २०१४ नंतर दोन, अडीच वर्षे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले, अन्यथा हा प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाला असता, असा दावाही जाेशी यांनी केला.

    काॅंग्रेसचे प्रवक्ते गाेपाळ तिवारी यांनी पुणे मेट्राेची संकल्पना तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांचीच हाेती असे नमूद करीत भाजपने या कामाला विलंब केल्याचा आराेप केला. ज्यांचा या प्रकल्पाशी फार संबंध नाही, किंबहुना ज्यांनी या प्रकल्पात होता होईल तो अडथळेच आणले, अशा भारतीय जनता पक्षाला आता स्वप्नपूर्तीच्या उकळ्या फुटू लागल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आकसाने पुणे मेट्रो मागे ठेवून, परवानगी नसलेली ‘नागपूर मेट्रो’ पुढे केली त्यामुळे पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाला चार वर्षे विलंब झाला. त्यातून या प्रकल्पाचा खर्च किमान अडीच ते तीन हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जो निधी देणे अपेक्षित आहे त्यात त्यांनी पन्नास टक्के कपात केल्याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले आहे.