‘कुरकुंभ’मधील तीन कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; उत्पादन बंद करण्याचे आदेश

    पाटस : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील डाय केम, युके, इंटरमीडिएट व अर्थ केम, या तीन रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच दिले आहेत. या कंपन्यांची वीज व पाणी पुरवठाही बंद करून कारवाई करण्यात आली आहे. तर पाच कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांना या रासायनिक उत्पादन घेत आहेत. मात्र, या कंपन्याकडून रसायनयुक्त दूषित सांडपाण्यावर शुद्धीकरणांची कोणतीही प्रक्रीया न करता ते पाणी ओढ्याद्वारे उघड्यावर सोडले जाते. प्रत्येक वर्षी या कंपन्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात हे रासायनिकयुक्त दूषित सांडपाणी सोडत आहेत. परिणामी, हे दूषित सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. या भागातील पाणी पुरवठ्याचा स्त्रोत असलेल्या विहिरी व बोअरवेलमधील पाणी साठा ही दूषित झाला आहे.

    काही दिवसांपूर्वी या वसाहतीमधील कंपन्यांनी पावसाच्या पाण्यात दूषित सांडपाणी सोडले होते. परिणामी हे रासायनिक सांडपाणी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने चार दिवस पुण्याकडून सोलापूर बाजूकडे जाणारी वाहतूक तीन किलोमीटर अंतरावर बंद करण्यात आली होती. दूषित सांडपाण्याबाबत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, तरीही या कंपन्यावर ठोस कारवाई होत नसल्याने या कंपन्यांनी दूषित
    रासायनिकयुक्त सांडपाणी सोडण्याचा सपाटा चालूच ठेवला होता.

    काही दिवसांपूर्वी कुरकुंभ औदयोगिक वसाहतीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप व विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांच्या पथकाने २५ कंपन्यांची तपासणी केली होती. रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता कंपन्याबाहेर पाणी सोडणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी या अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि नागरीकांना दिले होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप व विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांच्या पथकाने २५ कंपन्यांची तपासणी केली होती. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुरकुंभ वसाहतीतील डाय केम, युके, इंटरमीडिएट, व अर्थ केम, या तीन कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले.

    तसेच त्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचा ही आदेश दिला आहे. तर बिना मिक्स ऑरगॅनिक, रेणुका केमिकल , जे पी लॅब,विश्व लॅब, व राम कमल केमिकल, या पाच कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सुरेश ऑर्गेनिक, भू शिल्पा केमिकल, सिद्धिविनायक केमिकल, रॉयल एम्ब्रोईडरी, चाम्स केमिकल, एक्सप्लेट केमिकल, कुलकर्णी ऑरगॅनिक, या ७ कंपन्यांनी अपुरी माहिती दिल्याने परत माहिती मागणण्यात आली असून, या ७ कंपन्यांवर कारवाई प्रस्तावित आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.