अवसरी बुद्रुक येथील बेलसरवाडी रस्त्याची दयनीय अवस्था

मंचर :  आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील खालचा शिवार मार्गे बेलसरवाडी रस्ता काही ठिकाणी वाहुन गेला आहे. चिखलमय झाल्याने वाहतुकीसाठी बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी माजी उपसरपंच अशोक हिंगे पाटील यांनी केली आहे.
-मुसळधार पावसामुळे रस्ता चिखलमय
बेलसरवाडी व खालचा शिवार येथील ग्रामस्थांना खालचा शिवार मार्गे अवसरी गावात येण्यासाठी जवळचा रस्ता आहे. शाळा, कॉलेज, किराणा,भाजीपाला, बँका,पतसंस्था असल्याने बेलसरवाडी खालचा शिवार येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात येण्याजाण्यासाठी वर्दळ असते. अवसरी बुद्रुक पासून ते खालचा शिवार पर्यंत डांबरी रस्ता झाला आहे.
पुढील खालचा शिवार ते बेलसरवाडी रस्ता अद्याप न झाल्याने मागील पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता चिखलमय होऊन वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांना निरगुडसर मार्गे पाच किलोमीटर दूरच्या अंतरावरुन अवसरी गावात ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेलसरवाडी ते खालचा शिवार रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण मंजूर होण्यासाठी लवकरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  विवेक वळसे पाटील यांना ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे माजी उपसरपंच अशोक हिंगे पाटील यांनी संगितले.