पुलावरील स्वागत कमानीच्या कामाला स्थगिती द्या

पुलाच्या दोन्ही बाजूस पदपथावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे स्वागत कमानीच्या मुख्य खांबासाठी असण्याची शक्यता आहे. या खांबांमुळे दोन्ही बाजूकडील पदपथ पूर्ण व्यापून जाईल. त्यामुळे पादचारी चालण्यासाठी पुलावरील अरुंद रस्त्याचा वापर करतील.

    पिंपरी: आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सांगवीतील भाजपचे नगरसेवक दिखाऊपणा करण्यासाठी घाई-घाईने पुलाजवळ आणि मुळा नदी पात्रालगतच स्वागत कमान उभारण्याचे काम करून घेत आहेत. मात्र, पुलावर असणारा वाहतुकीचा ताण, अपघातांचे प्रमाण, पुलाची रुंदी व इतर तांत्रिक बाबी तपासता ही जागा स्वागत कमानीस योग्य नाही. त्यामुळे या कमानीच्या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे यांनी केली आहे.

    याबाबत शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. सागंवीतील सव्र्हे क्रमांक १३ मधून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मुळा नदीवर पुल आहे. हा पुल हा पुणे महापालिका आणि पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीला जोडण्याचे काम करतो. या पुलाची रुंदी १२ मीटर आहे. यात तीन मीटर पदपथ आहे. पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. हा पुल सांगवी, नवी सांगवी, पिंपळे – गुरव व पिंपरी – चिंचवड येथील लोकांसाठी पुण्यात जाण्या-येण्यास एक महत्वाचा मार्ग आहे. पुलावर सांगवीच्या सुरवातीच्या बाजूस महापालिकेतर्फे सांगवी प्रवेश हद्दीवर कायमस्वरूपी स्वागत कमान उभारण्याचे काम सुरु झाले आहे.

    या कामासाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पदपथावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे स्वागत कमानीच्या मुख्य खांबासाठी असण्याची शक्यता आहे. या खांबांमुळे दोन्ही बाजूकडील पदपथ पूर्ण व्यापून जाईल. त्यामुळे पादचारी चालण्यासाठी पुलावरील अरुंद रस्त्याचा वापर करतील. परिणामी या ठिकाणी भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगवीमध्ये प्रवेश करण्यासाठी अन्य अजून दोन मार्ग आहेत. त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण नियोजन करून स्वागत कमान करावी, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.