कंपन्यांकडून थकित रक्कम मिळवून देण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांचे आमदारांना साकडे

तळेगाव दाभाडे : कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात अनेक कंपन्यांनी मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची देणी थकविल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. संबंधित कंपन्यांकडून त्यांना त्वरित न्याय

तळेगाव दाभाडे  : कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात अनेक कंपन्यांनी मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची देणी थकविल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. संबंधित कंपन्यांकडून त्यांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी  मावळ अ‍ॅग्रो कंपनी आणि मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेने आमदार सुनील शेळके यांना निवेदन दिले. संबंधित कंपन्यांशी चर्चा करून पोल्ट्री व्यावसायिकांना थकबाकीची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले असल्याची माहिती समन्वयक सोनाबा गोपाळे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील सुमारे १२०० पोल्ट्री व्यावसायिकांच्या थकीत रकमा संबंधित कंपन्यांकडून येणे आहे. मावळ अ‍ॅग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे, मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे यांनी आमदार सुनील शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या १६-१७ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. परंतु कोरोनामुळे तो व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

गेल्या अडीच ते तीन महिन्यांत चिकनबाबत समाज माध्यमातील अनेक अफवांमुळे हा व्यवसाय बंद पडला आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी या काळात ज्या कंपन्यांशी करार करून पक्षी सांभाळले होते ते काही कंपन्यांनी नेले नाहीत. तर काहींनी ते पक्षी वाऱ्यांवर सोडून द्यायला सांगितले. तर  काहीं कंपन्यांनी बाजारातील अफवांमुळे अतिशय अल्प दरात पक्षी उचलले. दोन ते तीन महिने झाले तरी, काही कंपन्यांनी पोल्ट्री मालकांना अद्याप त्यांचे पेमेंट दिले नाही. कोरोना लाॅकडाऊन संदर्भात विविध कारणे देत पेमेंट देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीला तोंड देत आहेत.

मावळ तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल व रोजगारी निर्माण झालेली आहे. ज्या पोल्ट्री मालकांची पेमेंट दिलेली नसतील अशा कंपन्यांना समज देऊन शेतकऱ्यांंचे पेमेंट मिळवून देण्यासाठी मदत व सहकार्य करण्याची विनंती आमदार शेळके यांना निवेदनात करण्यात आलेली आहे.