प्लॉट खरेदीच्या बहाण्याने पाऊणकोटीचा गंडा; आरोपीचा कोरोनाने मृत्यू, नागरिकांची पोलिस ठाण्यात धाव

२०२१ मध्ये आरोपी फुझले यांना कोरोना झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचा सगळा व्यावसाय मी पाहणार आहे, ते आजारी आहेत, असे सांगत या नागरिकांना शांत केले. मात्र, एप्रिल महिन्यात आरोपी फुझले यांचा मृत्यू झाला. त्यानतंर त्यांच्या पत्नीनेही हात वर केले.

    पिंपरी: प्लॉट खरेदी करून देतो असे सांगत एकाने आठ लोकांकडून ७२ लाख १४ हजार रुपये घतेले. मात्र, त्यांना कोणाताही प्लॉट खरेदी करून दिला नाही. तसेच पैसेही परत न करता फसवणूक केली. त्यातच एप्रिल २०२१ मध्ये आरोपीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

    मयूर ज्ञानेश्वर कुंभार (वय २८, रा. वाकडरोड, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय मारोतराव फुझले (वय ४४, पुराणीक आदित्या, बाणेर रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फुझले यांचे एप्रिलमध्ये कोरोना संंसर्गामुळे निधन झाले आहे. जानेवारी २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत ही घटना घडली. आरोपी फुझले याने २०१९ पासून नागरिकांकडून प्लॉट खरेदी करून देतो, असे सांगत पैसे घेतले. फिर्यादी यांच्याकडून चार लाख रुपये घेतले आहेत. तसेच दिलीप चव्हाण यांच्याकडून चार लाख, शोभा राजू साळूंके यांच्याकडून दहा लाख, गुलाब नामदेव झारगड यांच्याकडून दहा लाख, आनंद भास्कर वाघमारे यांच्याकडून ६ लाख ११ हजार, मंदार अप्पासाहेब क्षीरसागर यांच्याकडून २५ लाख, मोहम्मद साकूर यांच्याकडून १० लाख ५१ हजार, पृथ्वीनाथ प्रभूनाथ यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपये असे एकूण ७२ लाख १४ हजार रूपये घेतले.

    आरोपी फुझले याने या सर्वांना प्लॉट घेऊन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्लॉट घेऊन देत नसल्याने सर्व नागरिकांनी फुझले याच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लागला. आरोपीने सर्वांना धनादेश दिले, मात्र, ते बाऊंस झाले. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये आरोपी फुझले यांना कोरोना झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचा सगळा व्यावसाय मी पाहणार आहे, ते आजारी आहेत, असे सांगत या नागरिकांना शांत केले. मात्र, एप्रिल महिन्यात आरोपी फुझले यांचा मृत्यू झाला. त्यानतंर त्यांच्या पत्नीनेही हात वर केले. त्यामुळे फिर्यादी कुंभार यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आरोपीने आणखी नागरिकांकडून पैसे घेतल्याची शक्यता आहे. या पैशाचा वापर आरोपीने कशासाठी केला आहे, आरोपीच्या खात्यावर हे पैसे आहेत का, आरोपीबरोबर या प्रकारात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे, असे तपास अधिकारी फौजदार अजित काकडे यांनी सांगितले.