पश्चिम महाराष्ट्रात ‘पाॅवरप्ले’ :  भाजपची पीछेहाट ; राष्ट्रवादीच्या खेळीने ‘बडे’ नेते गारद

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत राष्ट्रवादीची 'पाॅवरफूल' खेळी यशस्वी ठरली. काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या झंझावातात भाजप गारद झाली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला बसलेला हा मोठा सेटबॅॅक आहे. रंगलेल्या आखाड्यात अखेर राष्ट्रवादीच्या प्रदेेशाध्यक्षांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांंना अस्मान दाखविले.

संदीप पाटील ; पुणे : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत राष्ट्रवादीची ‘पाॅवरफूल’ खेळी यशस्वी ठरली. काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या झंझावातात भाजप गारद झाली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला बसलेला हा मोठा सेटबॅॅक आहे. रंगलेल्या आखाड्यात अखेर राष्ट्रवादीच्या प्रदेेशाध्यक्षांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांंना अस्मान दाखविले.

पुणे पदवीधर भाजपच्या वहिवाटीचा मतदार संघ. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोनदा तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनदा या मतदार संघातून विजय मिळविला होता. २४ वर्षे हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात होता. गतवेळी राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातून धडा घेतलेल्या राष्ट्रवादीने प्रमुख इच्छुकांना थांबवित अरुण लाड यांच्यामागे एकमुखी शक्ती उभी केली. दिमतीला काॅग्रेस व शिवसेनेची फौज होती. महाविकास आघाडीची ताकद एकटल्याने राष्ट्रवादीच्या विजयाची वाट सुकर झाली. अरुण लाड यांनी १ लाख २२१४५ मते मिळविताना पहिल्या पसंतीचा १ लाख १४१३७ मतांचा कोटा पूर्ण केला. भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३३२१ मतांवर समाधान मानावे लागले. लाड यांनी ४८ हजार ८२३ मतांची आघाडी घेत देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Mahavikas Aghadi government which is struggling for power has overwhelmed the common man

-चंद्रकांत पाटलांना धक्का 

या निवडणुकीत भाजपने मोठा फौजफाटा रिंगणात उतरविला होता. जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाची यंत्रणा होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः निवडणुकीची सुत्रे हाती घेतली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रचारात उडी घेतली होती. बुथ पातळीवरदेखील भाजपने खास यंत्रणा उभी केली होती. पुण्यातील प्रबळ दावेदार राजेश पांडे यांना प्रचारप्रमुख करताना डाॅ. राजेंद्र खेडेकर यांचे बंड शमविले. प्रचारात आत्मविश्वास दिसत होता. मात्र उसने अवसान आणून केलेला प्रचार भाजपला तारु शकला नाही.

-जयंत पाटील ठरले भारी

लाड- देशमुख असा सामना होता. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात राष्ट्रवादीचे पाटील भाजपच्या पाटलांना भारी पडले. राष्ट्रवादीने भाजपची हॅटट्रीक रोखत चंद्रकांत पाटील यांना धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर ) अशा मात्तबर नेत्यांनी झंझावती प्रचार केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात घालून काम केल्याने पदवीधर व शिक्षकमध्ये महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला. भाजप बंडखोरी रोखू शकली. मात्र असंतुष्ठांचा असंतोष, भाजपेयींची खदखद रोखू शकली नाही.

-आयात उमेदवाराचा फटका  

आयातांना उमेदवारी देण्याचा पायंडा मुळच्या कार्यकर्त्यांना रचलेला नाही. पदवीधर व शिक्षकची पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली होती. या वाढीव मतांवर भाजपची भिस्त होती. मात्र अपेक्षित मतदान खेचण्यात भाजपची यंत्रणा अपुरी पडली. कोथरुडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आपल्या इच्छेला मुरड घातली होती. चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभेतील प्रवेशानंतर पदवीधरच्या जागेवर कुलकर्णी यांचाच प्रबळ दावा होता. मात्र त्यांना डावलून सांगली जिल्ह्यात दिलेली उमेदवारी भाजपच्याच कार्यकर्त्यांना पसंत पडली नव्हती. दुसरीकडे सलग बारा वर्षे भाजपच्या ताब्यात आमदारकी असताना आपले प्रश्न कायम असल्याची भावना पदवीधरांमध्ये निर्माण झाली होती.

– भाजप नेत्यांची जादू निष्प्रभ 

संग्राम देशमुख यांच्यासाठी फडणवीस यांच्यासह भाजपच्या धुरिणांनी जंग जंग पछाडलं. मात्र राष्ट्रवादीच्या पाॅवरफूल फळीपुढे भाजपची जादू चालली नाही. सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेते देशमुख यांच्या व्यासपीठावर होते. मात्र पक्षांतर्गत गटबाजी लपून राहीली नाही.देशमुख यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्याचे पैसे थकविल्याचा विरोधकांचा आरोप भाजपसाठी आणखी अडचणीचा ठरला. या उलट अरुण लाड यांना वडील क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांचा असलेला वारसा, साखर कारखान्याचा उत्तमरितीने सांभाळलेला कारभार, सर्वसमावेशक व संयमी चेहरा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, राष्ट्रवादीच्या गटातंटानी मतभेद बाजूला ठेवून एकजिनसीपणे केलेला प्रचार राष्ट्रवादीच्या कामी आला.

-अरुण लाड का जिंकले ?

○  राष्ट्रवादीचा सर्वसमावेशक चेहरा

○ काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सुसंवाद

○ क्रांतिकारकाच्या घराण्याचा वारसा

○ महाविकास आघाडीची एकजूट

○ पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांची ताकद

○ मतदार संघातील राष्ट्रवादीचे भक्कम नेटवर्क

○ मतदार नोंदणीत घेतलेली आघाडी

-संग्राम देशमुख का हरले ?

○ नेते प्रचारात, मात्र कार्यकर्ते संभ्रमात

○ पुण्याऐवजी सांगलीत दिलेली उमेदवारी

○ साखर कारखान्यासंबंधी झालेले आरोप

○ भाजपमधील जुन्या-नव्यांतील दरी

○ पक्षांतर्गत गटबाजीने विखुरलेली शक्ती

○ स्वजिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा विरोध

○ प्रचाराचे मतदानात न झालेले रुपांतर