मुलांसाठी ‘चिल्ड्रन फ्रेंडली’ कोविड हॉस्पिटलची तयारी सुरु

    पिंपरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. नवीन जिजामाता रुग्णालयात लहान मुलांसाठी ५० आणि पालकांसाठी ५०, असे १०० बेड तयार केले आहेत. मुले आनंदी राहावीत, मुलांची करमणूक व्हावी यासाठी रुग्णालयातील भिंतीवर डोरिमोन, मोगली, प्राण्यांचे कार्टून चिटकविण्यात आले आहेत. मुलांसाठी विविध खेळणीही ठेवली आहेत. यामुळे मुलांचे उपचाराला सहकार्य मिळेल. मुले घाबरणार नाहीत, असे जिजामाता रुग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय डॉ. बाळासाहेब होडगर यांनी सांगितले.

    कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासन तयारी करत आहे. लहान मुलांना पालकांसह रुग्णालयात राहता येईल, असे नियोजन केले जात आहे. लहान मुलांकरिता वायसीएममध्ये ऑक्सिजनचे १५० व आयसीयूचे ३० बेड तयार केले जाणार आहेत. त्यातील नवजात बालकांसाठी १५ आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १५ बेड राखीव असतील. घरकुलमधील चार इमारतीत सीसीसी सेंटर केले जाणार असून तेथे लक्षणेविरहित मुलांना ठेवले जाईल. जिजामाता हॉस्पिटलमध्ये मुलांसोबत आईला राहता येईल, असे नियोजन केले आहे. लहान मुलांची करमणूक व्हावी यासाठी खेळणी ठेवली आहे.

    याबाबत बोलताना जिजामाता रुग्णालयातील डॉ. बाळासाहेब होडगर म्हणाले, मुलांना दवाखान्याची भीती वाटू नये. मुले आनंदी, उत्साही राहावीत यासाठी वॉल पेंटिंग लावले आहे. त्यावर डोरिमोन, मोगली, प्राण्यांचे विविध कार्टून आहेत. पेंटिंग करण्यासाठी मुलांचा हात पुरेल अशा उंचीवर बोर्ड लावला आहे. कार, घर तयार करण्यासाठी छोटे ब्लॉक अशी खेळणी आणि बॉल ठेवले आहेत. कार्टून असलेले पडदे लावले असून बेडशीटही बदल्या जाणार आहेत. कार्टून असलेले बेडशीट खाटेवर ठेवण्यात येणार आहे.

    मुलांना एकत्रित खेळण्यासाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. लहान मुलांच्या दृष्टीने सुरक्षित असलेली खडू, कलर पेंट, कॅरम अशा प्रकारची खेळणी ठेवली आहे. टीव्ही देखील ठेवला असून, त्यावर कार्टून चॅनेल आहेत. मुलांना दवाखान्याची भीती वाटू नये. मुले आनंदी, उत्साही राहणे हा एक उपचाराचा भाग आहे. यामुळे मुलांचे उपचाराला सहकार्य मिळेल. मुले घाबरणार नाहीत. यासाठी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मार्गदर्शन केले. स्थापत्य विभागाने सहकार्य केले असल्याचे डॉ. होडगर यांनी सांगितले.