निरवांगीच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य : रेखा गायकवाड

    निमसाखर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या रेखा गायकवाड यांची निरवांगी गावच्या महिला सरपंच म्हणून निवड झाली. ३६०० लोकसंख्या आिण १८७५ मतदार संख्या असलेल्या गावाची जबाबदारी कोरोना संक्रमणाच्या काळात या महिला सरपंचांनी आपल्या खांद्यावर घेतली. सरपंचपदी निवड झाल्यानंतर आलेले अनुभव व पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या संकल्पना त्यांनी मांडल्या. नियाेजनबद्ध कामातून गावच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सरपंच रेखा गायकवाड यांनी सांगितले.

    साठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित

    सरंपच गायकवाड म्हणाल्या , सध्या कोरोना संक्रमनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत अाहे. निधी अभावी अनेक कामे प्रलंबित आहेत. साधारण साठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून काही कामांचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात आला अाहे. तर काही कामांचे प्रस्ताव तयार आहेत. ते पंचायत समितीकडे पाठविणे बाकी आहे. दहा लाख रुपये खर्चून ग्रामपंचायत कार्यालयाची सुसज्ज इमारत साकारण्यात अाली असून लवकरच या इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये औषध फवारणी करण्यात आली असून गावांतच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने नागरिकांना सोयी सुविधा देणे शक्‍य झाले. सध्या ४५ वर्षावरील ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

    पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार

    सध्या वाड्या-वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. पेयजल योजनेतून या ठिकाणी एक विहीर बांधण्यात अाली आहे. मात्र त्या विहिरीला पुरेसे पाणी नाही. त्यामुळे नव्याने वाघाळे तलावात इतर विहिरींप्रमाणे निरवांगीलाही या तलावात विहीर घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. हर घर जल ही पिण्याच्या पाण्याची योजना निरवांगीसाठी मंजूर झाली असून या योजनेसाठी दोन कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे. गावातील व वाड्या-वस्त्यावरील अंतर्गत सिमेंटचे रस्ते, बंदिस्त गटारे, हायमास्ट दिवे व घरकुल योजनेची कामे पुढील काळात मार्गी लावणार आहोत,  असे सरपंच गायकवाड यांनी सांगितले.

    महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही

    निरवांगी बसस्थानकापासून अगदी जवळ बारामती-अकलूज रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती व देखभाल अथवा नूतनीकरण करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेला संरक्षक भिंत बांधून बांधण्यात येणार अाहे. निरवांगी बसस्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एकुण नऊ सदस्यांपैकी पाच महिला सदस्य अाहेत. महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर भर देणार अाहे. आरोग्यविषयक वेगवेगळ्या योजना राबवून महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सरंपच गायकवाड यांनी नमुद केले.

    ”निरवांगीमध्ये संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा मुक्कामी असताे. पालखी साेहळ्यातील वारकरी, भक्तांची योग्य सोय होण्यासाठी व पालखी तळासाठी आरक्षित असलेल्या पाच एकर जागेमध्ये पालखी  ठेवण्यासाठी चबुतरा व तीन खोल्या बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी पाठपुरावा करण्यात येईल”.

    – रेखा गायकवाड, सरपंच निरवांगी

     

    (शब्दांकन : सत्यजित रणवरे)