खाजगी  रुग्णालयांनी नियमानुसार दर आकारणी करावी

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना करुन खाजगी

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन
 पुणे :
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी  रुग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दर आकारणी करावी, अशा सूचना करुन खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज कॉन्सिल हॉल मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, भारती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. अस्मिता जगताप यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड मधील खाजगी रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, व डॉक्टर उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशात निश्चित करून दिल्यानुसार दर आकारणी करावी. खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी, तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी, असे सांगून रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.