प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकानं (Professor suicide) सासवड (Saswad) येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पुणे: फेसबुक पोस्ट (facebook) करत पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकानं (Professor suicide) सासवड (Saswad) येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट वाचून अनेक विद्यार्थ्यांसह नातेवाईकांना धक्का बसला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करत आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    प्रफुल्ल मेश्राम असं आत्महत्या करणाऱ्या प्राध्यापकाचं नावं असून ते कात्रज याठिकाणी वास्तव्याला होते. मृत प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या फेसबुक अकाउंटवर “बाय बाय डिप्रेशन,” “सॉरी गुड्डी” अशा आशयाची पोस्ट केली होती. यानंतर त्यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतीमधील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

    मेश्राम यांची पोस्ट पाहून त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती सासवड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता, भिवरी गावातील एका विहिरीजवळ मेश्राम यांची चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल या वस्तू आढळल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीत शोध घेतला असता मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. मेश्राम यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

    काही दिवसांपूर्वी मेश्राम यांना अर्धांग वायूचा झटका आला होता. यातून ते बरेही झाले होते. पण त्यांना मागील काही काळापासून नैराश्यानं ग्रासलं होतं. ते कोणाशी बोलतही नव्हते. याच मानसिक तणावातून त्यांनी आपलं जीवनं संपवलं असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या लेकीची माफी मागीतली असून आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही कारणीभूत धरू नये, असंही त्यांनी संबंधित पोस्टमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.