पाच महिन्यांत २६४ कोटींचा मालमत्ताकर जमा ;. गतवर्षीपेक्षा ६० कोटींनी उत्पन्न वाढले

मागील वर्षी ऑगस्टअखेर २०४.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात ६० कोटींचे भर पडली आहे. महापालिकेने मालमत्ताकर लागू नसलेल्या मालमत्ता शोधल्या.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेला २०२१ – २२ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात मालमत्ताकरातून (Property tax collection) २६३ कोटी ९६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा ६० कोटींनी अधिकचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे.

    कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतची माहिती दिली. चालू आर्थिक वर्षात कर आकारणी विभागाला १ हजार ८२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. पिंपरी – चिंचवड शहरात आजमितीला ५ लाख २७ हजार ३३८ मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख ४७ हजार ८, बिगरनिवासी ४६ हजार ८२८, औद्योगिक तीन हजार ७००, मोकळ्या जागा आठ हजार ७८१, मिश्र १५ हजार ८१९ आणि इतर पाच हजार २०२ मालमत्ता आहेत. ‘एलबीटी’ बंद झाल्यापासून मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.

    चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात ४० कोटी, मे मध्ये ४९.५७ कोटी, जून ८८.४० कोटी, जुलै ५७.९२ कोटी आणि ऑगस्ट महिन्यात २८.०७ कोटी रुपये असे एकूण २६३.९६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी ऑगस्टअखेर २०४.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात ६० कोटींचे भर पडली आहे. महापालिकेने मालमत्ताकर लागू नसलेल्या मालमत्ता शोधल्या. वाढीव, नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात आल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे स्मिता झगडे यांनी सांगितले.