कोरोनाच्या संकटकाळात दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी अहमदनगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकरी कार्यालया समोर शनिवारी वाढत्या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवून, कोरोनाच्या

कोरोनाच्या संकटकाळात दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी

अहमदनगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकरी कार्यालया समोर शनिवारी वाढत्या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवून, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांचा विचार करुन दरवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन भाकपचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, आयटकचे जिल्हा सचिव अॅड. सुधीर टोकेकर, महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे राज्य सचिव शंकर न्यालपेल्ली, क्रांतीसिंह नाना पाटील कामगार संघटनेचे बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, विजय भोसले, किशोर कांबळे, दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, अशोक आमटे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

-दरवाढ सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक

देशात पेट्रोल व डीझेलचे भाव गेल्या पंधरा दिवसांमध्ये जवळपास आठ ते दहा रुपयाच्या आसपास वाढले आहे. यापूर्वी ७० ते ७३ रुपये लिटर पर्यंत पेट्रोल मिळत होते. तसेच डिझेल मध्ये ही ५ ते ८ रुपयाने वाढ झालेली आहे. कोरोना महामारीच्या संकटातून जनता सावरत असताना अत्यावश्‍यक गरज असलेल्या इंधनची दरवाढ करुन सर्वसामान्यांना केंद्र सरकारने जोराचा झटका दिला आहे.

वास्तविक कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारे दरवाढ झालेली नाही. तरी देखील नागरिकांच्या माथी पेट्रोल व डीझेलची दरवाढ मारण्यात आली. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक आहे. सध्याच्या काळात कामगार, कष्टकरी, शेतकरी यांना सर्वसामान्य कामासाठी दुचाकीची आवश्‍यकता असते. तसेच शेतीसाठी ट्रॅक्‍टर व छोट्या उद्योगांना लागणारी वाहने यांना देखील पेट्रोल व डिझेल मध्ये होणारी वाढ परवडणारी नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पेट्रोल व डीझेलचे वाढत्या दरावर नियंत्रण आणून दरवाढ कमी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.