बारामती-इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी १२०० कोटींची तरतूद

जिरायती भागातील पाणी प्रश्न मिटणार उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन पाळले

    बारामती : राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर व बारामती तालुक्यातील सिंचनासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान या दोन तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटविण्याचे दिलेले आश्वासन आत्ता पाळले आहे. या निधीमुळे या दोन तालुक्यातील पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

    अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प जाहीर करताना राज्यातील जलसिंचनासाठी १२ हजार कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले आहे. पवार यांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे बारामती व इंदापूर तालुक्यातील जनतेने स्वागत केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती व इंदापूर प्रश्नावरून टीकेची झोड उठवली होती.त्यामुळे याठिकाणचा पाणी प्रश्न चांगलाच गाजला होता .उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकी दरम्यान या तालुक्यातील जनतेला दिलेले आश्वासन पाळले आहे.

    या निधीमुळे बारामती तालुक्यातील पुरंदर उपसा जलसिंचन योजना किंवा जनाई शिरसाई उपसा जलसिंचन योजना तसेच इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना असेल किंवा इतर योजनांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.