सरकारी वकीलास लाच स्वीकारताना अटक ; खेडमधील घटना

गुन्हयाचा पुढील तपास पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपविभागीय अधिकारी विजयमाला पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस नाईक रतेश थरकार, महिला पोलीस शिपाई शिल्पा तुपे इतर करीत आहेत.

    राजगुरूनगर: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलाला साडे तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १४) ही कारवाई केली आहे.

    देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय ५७, रा. औंध) असे पकडलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार तक्रारदार यांच्या अशिलाचा जामीन अर्ज न्यायालयात आहे. त्यावेळी त्या जामिनावर सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी लोकसेवक देवेंद्र यांनी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

    त्याची तक्रार पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आज सापळा कारवाईत तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

    गुन्हयाचा पुढील तपास पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपविभागीय अधिकारी विजयमाला पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस नाईक रतेश थरकार, महिला पोलीस शिपाई शिल्पा तुपे इतर करीत आहेत. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी एसीबीकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.