पुणे जिल्हा प्रशासन कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सज्ज ; जिल्ह्यात २१९ कोविड केअर सेंटर

लहान मुलांसाठी ६ हजार १६५ खाटा राखीव ; तब्बल ८१ हजार खाटांचे नियोजन

    पुणे : जगभरात काही देशामंध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सज्ज झाले असून तब्बल ८१ हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापासून खबरदारी घेण्यासाठी हे नियोजन केल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत सांगितले. नियोजित एकूण खाटांपैकी लहान मुलांसाठी ६ हजार १६५ खाटा राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना स्थितीचा या बैठकीत आढावा घेतला. संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत घ्यावयाची खबरदारी आणि जिल्हा व पालिका प्रशासनाकडून केलेल्या पूर्वतयारीची माहिती त्यांनी घेतली. राव यांनी कोरोनाबाबतच्या आकडेवारीचे या वेळी सादरीकरण केले.

    ऑगस्टनंतर संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता
    पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २१९ कोविड केअर सेंटर (सीसीसी), ६१५ समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि ६४ समर्पित कोविड रुग्णालयांत (डीसीएच) या खाटांची सोय केली जाणार आहे. पुणे शहरात ९ मार्च २०२० रोजी राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. सध्या दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र, येत्या ऑगस्टनंतर संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर हे नियोजन केले आहे.