ग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये स्पर्धेत पुणे अंतिम फेरीत ; ९९ देशांतील ६३१ शहरांनी घेतलाय सहभाग

इलेक्‍ट्रिक वाहने याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल 'ब्लूम्बर्ग'चे मनापासून आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे.

    पुणे: कोरोना महामारीशी सामना करतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या शहरांसाठी घेण्यात आलेल्या ‘ग्लोबल मेयर्स चॅलेंज’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याने धडक मारली आहे. ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजच्या वतीने या स्पर्धेचेचे आयोजन करण्यात आले होते.

    ग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये ९९ देशांतील ६३१ शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश आहे. भारतील केवळ दोन शहरे अंतिम फेरीत आहेत. पुणे शहराच्या वतीने सर्व इलेक्‍ट्रिक वाहनांचा भविष्यसाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज या स्पर्धेसाठी सादर करण्यात आली होती. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
    स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्‍टोबर २०२१ या कालावधीत होईल. यातून अंतिम १५ शहरांची निवड होईल. यात निवड होणाऱ्या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य दिले जाईल.

    इलेक्‍ट्रिक वाहने याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे मनापासून आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे, परंतु त्याचबरोबर झालेल्या शहराच्या विस्तारामुळे वाहन प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे, अशी माहिती निवडीबद्दल बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळयांनी दिली आहे.

    पर्यावरणस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्‍ट्रिक वाहनांना चालना देण्याचा आमचा संकल्प आहे.असेही ते म्हणाले आहेत.