पुण्यातील मार्केटयार्ड सोमवारी बंद !

लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ साेमवारी आयोजित केल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्र बंद'मध्ये मार्केटयार्ड येथील हमाल, कामगार सहभागी हाेणार आहे. यामुळे घाऊक बाजार बंद राहणार (Marketyard Closed) आहे.

    पुणे : लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ साेमवारी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मार्केटयार्ड येथील हमाल, कामगार सहभागी हाेणार आहे. यामुळे घाऊक बाजार बंद राहणार (Marketyard Closed) आहे. साेमवारी हाेणाऱ्या आंदाेलनासंदर्भात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील विविध संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयाची माहिती कामगार युनियनचे संताेष नांगरे यांनी कळविली.

    महाविकास आघाडीने लखिमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठक पार पडली. यात महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे विजय चोरगे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, नितीन जामगे, टेम्पो पंचायतीचे गणेश जाधव, चंद्रकांत जवळकर, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे विवेक ओंबासे, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे उपस्थित हाेते. यावेळी लखीमपुर येथील घटनेचा निषेध केला गेला आणि मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    या बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनही सहभागी हाेणार असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ यांनी कळविली आहे. बाजारातील फळे, भाजीपाला, कांदा – बटाटा, केळी आणि विड्याची पाने असा संपूर्ण बाजार बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.