पुणे महापालिका करणार मिळकतकर थकबाकी वसुल ; २३ गावांसाठी गावांसाठी करसंकलन मोहीम सुरू

ग्रामपंचायतींकडे मिळकतकरापोटी सुमारे १०० कोटी रुपये थकीत

  पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील मिळकतकर थकबाकीची वसुली महापालिकेतर्फे केली जाणार आहे. या ग्रामपंचायतींकडे मिळकतकरापोटी सुमारे १०० कोटी रुपये थकीत आहेत. सध्या महापालिकेतर्फे या गावांसाठी करसंकलन मोहीम सुरू केली जाणार असून, त्यानंतर थकबाकी वसुलीवर भर दिला जाईल.

  महापालिकेच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची अधिसूचना राज्य सरकारने ३० जून रोजी काढली. त्यानंतर महापालिकेने तातडीने या गावांच्या ग्रामपंचायतींमधील दप्तर ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या गावांमधील मिळकतींची नोंद करून एप्रिल २०२२पासून महापालिकेचा मिळकतकरही लागू केला जाणार आहे. त्यासंबंधीचे कामकाज सुरू झाले आहे.

  या गावांमधील दप्तरांची पाहणी करत असताना या २३ गावांमध्ये मिळून सुमारे १०० कोटी रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याचे पुढे आले आहे. आता ही गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने महापालिकेतर्फे ही थकबाकी वसूल केली जाणार आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

  समाविष्ट गावांमुळे महापालिकेच्या खर्चात वाढ होणार असली, तरी उत्पन्नातही भर पडणार आहे. या गावांमधील सुमारे शंभर कोटी रुपयांची थकबाकी; तसेच ७० ते ८० कोटी रुपयांची चालू मागणी महापालिकेला मिळू शकेल. या गावांमधील मिळकतींना महापालिकेच्या प्रचलित दरानुसार मिळकतकर लागू होईल. प्रत्येक वर्षी २० टक्के याप्रमाणे वाढ करून पाच वर्षांनंतर शंभर टक्के दराने कर आकारणी होणार आहे.

  अशा आहेत मिळकती
  समाविष्ट २३ गावांत एक लाख ९७ हजार मिळकतींची नोंद आहे. सर्वाधिक मिळकती वाघोलीत ४१ हजार ५५७ असून, नऱ्हे येथे ४० हजार ६८६, मांजरी बुद्रुक ४० हजार ६३१, बावधन बुद्रुक ८ हजार ९३९, किरकिटवाडी ८ हजार ५०, मांगडेवाडी ७ हजार ४११, पिसोळी ७ हजार ४७, कोंढवे-धावडे ६ हजार ८१४, औताडे-हांडेवाडी ४ हजार ८००, नांदेड ४ हजार ४१७, खडकवासला ४ हजार १७, म्हाळुंगे ४ हजार ४१, शेवाळेवाडी १ हजार ९७२, भिलारेवाडी १ हजार ७९६, होळकरवाडी १ हजार ५६८, गुजर निंबाळकरवाडी १ हजार ३६७, जांभूळवाडी १ हजार १००, नांदोशी-सणसनगर ५५७, वडाचीवाडी ४३६, तर कोपरे येथे ९७५ मिळकती आहेत.

  या गावांमधील मिळकतींची माहिती संकलित केली जात आहे. या गावांत सुमारे १०० कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. सध्या या गावांमध्ये फिरून मिळकतकर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. चालू मागणीतून ७० ते ८० कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे.

  - विलास कानडे, उपायुक्त तथा करसंकलन प्रमुख, महापालिका