प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहरामध्ये शहरी गरीब योजनेचे २० हजार लाभार्थी आहेत. त्यांना या रोगाची लागण झाल्यास उपचारासाठी ३ लाखांपर्यंतचा निधी मिळू शकतो. त्यामुळे शहरी गरीब योजनेचा लाभ घेणार्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

    पुणे: पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्ण संख्येतील घट देखील कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याचदरम्यान म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    आजपर्यंत या आजाराने शहरात १९ जणांचा मृत्यू झाला असून आणखी मृत्यू रोखणे व रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेने ही शोधमोहीम सुरू केली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत महापालिकेने दोन हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांशी संपर्क साधून या आजाराविषयीच्या लक्षणांची विचारपूस केली आहे. मात्र, यामध्ये ही लक्षणे असलेल्यांचे प्रमाण नगण्य असल्याचे सध्यातरी आढळून आले आहे.

    -उपचारासाठी ३ लाख रुपये महापालिका देणार
    म्युकरमायकोसिस या रोगासाठी महापालिकेने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. शहरी गरीब योजनेमधील सर्व लाभार्थींना या रोगावरील उपचारासाठी ३ लाख रुपये महापालिका देणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

    शहरामध्ये शहरी गरीब योजनेचे २० हजार लाभार्थी आहेत. त्यांना या रोगाची लागण झाल्यास उपचारासाठी ३ लाखांपर्यंतचा निधी मिळू शकतो. त्यामुळे शहरी गरीब योजनेचा लाभ घेणार्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी महापालिका प्रशासाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ज्या नागरीकांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. महापालिका वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपये देते. तर अन्य काही गंभीर अजारासाठी तीन लाख रुपये देण्यात येतात.

    म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी ससून व दळवी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन खरेदीसाठी स्थायी समितीच्या मार्फत टेंडर काढले जात आहे़ तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही या इंजेक्शन पुरवठ्याबाबत महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे.

    - विक्रम कुमार, आयुक्त, पुणे मनपा