pune nagar highway will remain closed on january 1 2021 for bhima koregaon anniversary nrvb
...म्हणून जानेवारीला पुणे-नगर महामार्ग राहणार बंद; 'या' कारणास्तव घेतलाय मोठा निर्णय; खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा (koregaon bhima) इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थिती (covid pandemic) असल्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. सर्वत्र खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहेच. अशात गर्दी टाळण्यासाठी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी तसा आदेश जारी केला आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थितीमुळे लोकांनी यावर्षी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन याआधीच प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता १ जानेवारी रोजी पुणे – नगर महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, या मार्गावरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

एल्गार परिषदेला परवानगी नाही

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आयोजक काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन

दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.