मोक्का कारवाईनंतर रवींद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या आळंदीतील सागर म्हस्केला पुणे पोलिसांकडून अटक

बऱ्हाटे हा आळंदी रोडवर असलेल्या सागर म्हस्के याच्या घरीच राहत असल्याचे समोर आले होते. पण, याप्रकरणी नाव समोर आल्यानंतर म्हस्के पसार झाला होता.

    पुणे: मोक्का कारवाईनंतर पसार काळात रवींद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या आळंदीतील सागर म्हस्केला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सागर संजय म्हस्के (वय ३२, रा. कळस,आळंदी रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जबरदस्तीने रो हाऊस बळकावणे, तसेच वार्षिक ६० टक्के व्याजाने पैसे देऊन जातीवाचक बोलत धमकावले. तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान कट रचून हा गुन्हा केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात माहीती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे तसेच इतर आरोपींच्या टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. मात्र, कारवाईनंतर बऱ्हाटे आणि तथाकथित पत्रकार देवेंद्र जैन हे दोघेही पसार होते.

    गेल्या एक ते दीड वर्षांपासून त्यांचा शोध घेतला जात होता. पण, ते मिळून आले नव्हते. मात्र गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी बऱ्हाटेला अटक केली. त्यानंतर बऱ्हाटे हा आळंदी रोडवर असलेल्या सागर म्हस्के याच्या घरीच राहत असल्याचे समोर आले होते. पण, तो याप्रकरणी नाव समोर आल्यानंतर पसार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.