पुण्यात शववाहिका पडतायत कमी, आता स्कूल बसमधून होणार प्रेतांची ने-आण, आरटीओनं दिली परवानगी

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिका कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच सध्या रिकाम्या असलेल्या स्कूल बसेसना शव वाहून नेण्याची परवानगी पुणे आरटीओनं दिलीय

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख अद्यापही चढताच आहे. देशात आता साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण दररोज आढळून येत आहे. देशातील बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्रातच आहेत. त्यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत महानगरांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची आणि मृत्युंची संख्याही वाढत चाललीय.

    पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिका कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच सध्या रिकाम्या असलेल्या स्कूल बसेसना शव वाहून नेण्याची परवानगी पुणे आरटीओनं दिलीय. पुणे महापालिकेनं शव वाहून नेण्यासाठी १० स्कूल बसेस देण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आलीय.

    फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झालीय. मार्च आणि एप्रिल महिन्यात तर प्रचंड वेगाने कोरोना रुग्णांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढलीय. आता तर हे प्रमाण इतकं वाढू लागलंय की पालिकेकडं असणाऱ्या शववाहिका शव वाहून नेण्यासाठी कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची ही लाट ओसरेपर्यंत इतर वाहनांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्याची गरज पालिकेला भासत आहे.

    परिवहन विभागाने १० स्कूल बस पालिकेला देऊ केल्या आहेत. या बसमधील सीट काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शव वाहून नेणं शक्य होणार आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत समोर येत आहे. मात्र पुण्याचा आलेख कधी खालावणार, असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडलाय.