पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा पुुणे ग्रामीण एलसीबीकडून छडा; दोघांना अटक

    इंदापूर : बावडा (ता.इंदापूर) येथे पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने अकलूज (जि.सोलापूर) येथून मंगळवारी (दि.१५) जेरबंद करुन पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

    अजय उर्फ प्रदीप प्रकाश खरात (वय २० वर्षे), प्रमोद प्रताप खरात (वय २१ वर्षे, दोघे रा.माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, जनार्दन शेळके, पोलिस नाईक गुरु गायकवाड, अभिजित एकशिंगे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, चालक हवालदार काशिनाथ राजापुरे यांनी ही कामगिरी केली आहे.

    संजय महादेव गोरवे (वय २८ वर्षे, रा.टाकळी टेंभुर्णी ता.माढा,जि.सोलापूर) याची आपल्या नातेवाईक असणाऱ्या महिलांशी जवळीक असल्याच्या संशयावरुन दादा कांबळे (रा. बावडा ता.इंदापूर) याने संजयचे मित्र लकी विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांच्यामार्फत जेवणाच्या निमित्ताने त्याला १७ जानेवारी रोजी बावड्यात बोलावून घेतले. संगनमत करून १७ जानेवारी २०२१ रोजी रात्री सात ते २० जानेवारी २०२१ च्या सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत संजय याला धारदार हत्याराने ठार मारले. त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून फेकून दिले. त्याची ओळख पटू नये, यासाठी उर्वरित धड भिमा नदीच्या पात्रात फेकून दिले.

    या प्रकरणी संजयची आई मंजुषा महादेव गोरवे (वय ५१ वर्षे,रा.टाकळी टेंभुर्णी ता.माढा,जि.सोलापूर) हिने दिलेल्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात दादा कांबळे, लकी भोसले व शैलेश सोनवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती. गुन्ह्यात निष्पन्न झालेले वरील दोघे आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.

    पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशाने रेकॉर्डवरील वॉन्टेड, फरारी आरोपी पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा विशेष मोहिम राबवित असताना, हे दोन्ही आरोपी मंगळवारी (दि.१५) अकलूज जि. सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्यावरुन त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी त्यांना इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.