आजपासून पुणे ‘अनलॉक’; शहरातील सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू राहणार!

सायंकाळी ५ नंतर शहरात संचारबंदी लागू असणार, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद

  पुणे : राज्य शासनापाठोपाठ पुणे महापालिकेने ‘अनलॉक’ जाहीर केले असून, दैनंदिन स्वरूपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करू शकणार आहेत. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.

  येत्या आजपासून (दि. ७ जून) या सुधारित नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बँका, सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था आठवडाभर काम करू शकणार आहेत. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीदेखील हे आदेश लागू आहेत. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग दिनांक ३० जून २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद राहतील.

  सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहणार असली, तरी शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू ठेवता येणार आहे. शहरातील हॉटेलांसह, खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सुरू राहणार आहेत.

  जवळपास चार महिन्यांनी पीएमपीची बस सेवा ५० टक्के आसन क्षमतेने सुरू होणार आहे. नाट्यगृहे तसेच चित्रपटगृहे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम फक्त ५० टक्के क्षमतेने घेता येणार आहेत. सलून, स्पा आणि ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल, सिनेमागृह नाट्यगृह. संपूर्णतः बंद राहणार आहेत.

  काय राहणार सुरू

  १. वकील, सी.ए यांची कार्यालये.
  २. रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट (आसन क्षमतेच्या ५० टक्के).
  सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा घरपोच सेवा रात्री ११.०० पर्यंत सुरू राहील.
  ३. उद्याने, खुली मैदाने केवळ चालणे व सायकलिंगसाठी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ०५.०० ते सकाळी ०९.
  ४. सर्व खासगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने.
  ५. सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  ६. शासकीय कार्यालये.
  ७. सर्व आउटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी ०५.०० ते ०९.०० या वेळेत सुरू राहतील.
  ८. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम ( ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार).
  ९. लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
  १०. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडित कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी.
  ११. विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा, निवडणुका या ५० टक्के उपस्थितीत घेण्यास परवानगी.
  १२. ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरू ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील.
  १३. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने/गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
  १४. ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
  १५. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपीएमएल) आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.

  -व्यायामशाळा, सलून, ब्यूटीपार्लर, स्पा, आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी वातानुकूल सुविधा (एसी) वापरता येणार नाही.

  -माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त. ३ व्यक्ती (चालक, क्लीनर, मदतनीस) यांना इतर प्रवाशांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करण्यास परवानगी राहील. खासगी वाहनातून, बस तसेच लांब अंतराच्या रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. शासनाने घोषित केलेल्या लेवल ५ मधील ठिकाणी थांबायचे असल्यास ई-पास असणे बंधनकारक राहील.

  -मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा सुरू राहील.