कोरोनामुळे पुणेकरांची बिअरची डिमांड कमी ; १ कोटी ९० लाख लिटरने खप घटला

कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीत मोठी घट झाली आहे. देशी मद्यविक्रीत १६ टक्के , भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यविक्रीत १२ टक्के , तर बिअरच्या विक्रीत ४१ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम महसूलावर देखील झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला पुणे जिल्ह्यासाठी १९७५ कोटी रूपये महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते.

    पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांनी थंड बिअरकडे पाठ फिरवली आहे. पुणेकर बिअरऐवजी मद्य ग्राहक व्हिस्की, रमकडे वळले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी बराच कालावधी मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूल गोळा करण्याचे उद्दिष्टही गाठता आलेले नाही.गेल्या आर्थिक वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यात बिअरच्या विक्रीत तब्बल एक कोटी ९० लाख ५८ हजार ७६३ लिटरने घट झाली आहे.

    याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीत मोठी घट झाली आहे. देशी मद्यविक्रीत १६ टक्के , भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यविक्रीत १२ टक्के , तर बिअरच्या विक्रीत ४१ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम महसूलावर देखील झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला पुणे जिल्ह्यासाठी १९७५ कोटी रूपये महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा केवळ १६९१ कोटी रूपये महसूल गोळा करण्यात यश मिळाले आहे.’ दरम्यान, कोरोना संसर्गमुळे पुण्यातील मद्य ग्राहकांनी बिअरकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य विक्रीमध्ये (रम, व्हिस्की) मोठी घट दिसून आलेली नाही. आरोग्य विभागाकडून करोना संसर्ग रोखण्याच्या विविध उपायांमध्ये कोमट पाणी पिण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.